‘कोविड सेंटर’ नकोच, शेगाव-रहाटगाव मार्गावर चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:01:22+5:30
आंदोलनाची माहिती मिळताच गाडगेनगर व नांदगावपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकवस्तीत कोविड सेंटरची उभारणी करू नये, अशी जोरदार मागणी महिला वर्गाने केली. परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संभावतो, अशी भीती त्यांनी पोलिसांपुढे स्पष्ट केली. शहराबाहेर अनेक मंगल कार्यालये व हॉल उपलब्ध आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेगाव-रहाटगाव मार्गावर तुळजा भवानी व विनय विला मंगल कार्यालयात कोविड-१९ सेंटर सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध करून परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून शेगाव मार्गावर बुधवारी सकाळी १०.५० ते ११.३० दरम्यान चक्काजाम आंदोलन छेडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती.
आंदोलनाची माहिती मिळताच गाडगेनगर व नांदगावपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकवस्तीत कोविड सेंटरची उभारणी करू नये, अशी जोरदार मागणी महिला वर्गाने केली. परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संभावतो, अशी भीती त्यांनी पोलिसांपुढे स्पष्ट केली. शहराबाहेर अनेक मंगल कार्यालये व हॉल उपलब्ध आहेत. आधी त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष चंदू खेडकर यांच्या नेतृत्वात शेगाव, रहाटगाव परिसरातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. नांदगावचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्याशी चर्चा केल्यानंतर चंदू खेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून त्यांचे बोलणे करून दिले. जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून, या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात येणार नाही, असे आश्वासन डीसीपी सोंळके यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले. आंदोलनात महेश निमकर, गिरीश दिघेकर, प्रशांत मोहोड, श्याम कारेगावकर, मंगेश मोहने, अरुणा इंगोले, मनीषा मालठाणे, सीमा दुबे, शीला इंगळे, शुभांगी खुरपटे, शीला आळे, जयश्री भवरे, देऊबाई कारेगावकर, शीला पांडे, मीना टाले, नलिनी थोरात यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित झाले होते.
आंदोलकांची पोलिसांशी बाचाबाची
कोविड सेंटर रद्द करण्यासंदर्भात लेखी पत्र द्या, अन्यथा सेंटरमध्ये तोडफोड करू, असे एका महिलेने म्हणताच याच मार्गाने निघालेले शहर कोतवालीचे ठाणेदार शिवाजी बचाटे व नांदगावपेठ पोलीस आंदोलकांवर चिडले. त्यामुळे नागरिक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अखेर चंदू खेडकर यांनी तोंडी आश्वासन मिळाल्याने आंदोलन तूर्तास मागे घेऊ, अशी शिष्टाई केली.