जिल्ह्यातील बाजार समितीत सुरू होणार कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:43+5:302021-05-01T04:12:43+5:30
अमरावती : काही दिवसांपासून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. दररोज रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसत आहे. ...
अमरावती : काही दिवसांपासून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. दररोज रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसत आहे. तालुक्याच्या ठिकाणी रुग्णांना रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांत कोविड सेंटर सुरू करण्याचा आदेश पणन संचालनालयाने २९ एप्रिल रोजी काढले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीत कोविड सेंटर सुरू होणार आहेत. त्यासाठी पणन संचालनालयाने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. सदर सेंटर तालुक्याच्या ठिकाणी राहतील. त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, हा यामागील उद्देश आहे.
कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी निगडित विलगीकरण कक्ष,ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडित सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता दिल्याचे पणन संचालनालयाने जारी केलेल्या पत्रात नमूद आहे. बाजार समित्यांना २५ टक्के रक्कमेच्या मर्यादेत कोविड सेंटर सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी १० लाखांपर्यंतच्या भांडवली खर्चास मंजुरीचे अधिकारी जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले आहे. १० लाखांवरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालक यांना दिले आहेत.
बॉक्स
कोविड सेंटर हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे, सदर सेंटरवरील विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून ऑक्सिजन कॉन्सेंलटेव तथा ऑक्सिजन सिलिंडर बेड सुविधा उपलब्ध करून देणे, सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशिनचा पुरवठा करण्यात यावा, सेंटरमधील विलगीकरण कक्षात येणाऱ्या रुग्णांना बाजार समितीने दोनवेळचे जेवण, नाष्टा व चहा यांची प्रामुख्याने व्यवस्था करावी लागणार आहे. कोविड केअर सेंटरचा कालावधी हा सुरुवातीला लॉकडाऊन कालावधी व त्यानंतर ३० दिवसांचा असेल. सदर कालावधी वाढविण्याची आवश्यकता असल्यास बाजार समितीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी चर्चा करून जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांचेकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
कोट
जिल्ह्यात १२ कृषी उत्पत्न बाजार समित्या आहेत. या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचे आदेश पणन संचालनालयाने २९ एप्रिल रोजी काढले. त्यानुसार यासंदर्भात पुढील निर्णयाबाबत बाजार समित्यांना कळविले आहे.
- संदीप जाधव,
जिल्हा उपनिबंधक