परतवाड्यात स्मशानभूमीसह कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:26+5:302021-05-03T04:08:26+5:30

बेडअभावी कोरोना रुग्णांची फरफट, अचलपूर तालुक्यातील परिस्थिती स्फोटक परतवाडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अचलपूर तालुक्यातील ...

Kovid Hospital Housefull with cemetery in the backyard | परतवाड्यात स्मशानभूमीसह कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल

परतवाड्यात स्मशानभूमीसह कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल

Next

बेडअभावी कोरोना रुग्णांची फरफट, अचलपूर तालुक्यातील परिस्थिती स्फोटक

परतवाडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अचलपूर तालुक्यातील परिस्थिती स्फोटक बनली आहे. यात ग्रामीण क्षेत्रासह नगरपालिका क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. उपचारादरम्यान कोरोना रुग्णाचे मृत्यूही घडत आहेत. यात परतवाड्यातील स्मशानभूमीसह कोविड रुग्णालय हाउसफुल्ल होत आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षवेधक ठरत आहे.

१ मे रोजी तर परतवाड्यातील हिंदू स्मशानभूमीत काहींना जागा मिळू शकली नाही. यात ते मृतदेह संबंधितांना खुल्या जागेत जाळावे लागले, हे वास्तव आहे.

अचलपूर तालुक्यात २८, २९, ३० एप्रिल या तीन दिवसात २४४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण भागातील १२० व नगरपालिका क्षेत्रातील १२४ रुग्णांचा समावेश आहे. अचलपूर कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसह देवमाळी स्थित खाजगी भामकर कोवीड रुग्णालयातील बेड यात कमी पडत आहे. दररोज पंधरा ते विस कोरोना ग्रस्त रुग्णांना बेड उपलब्ध नसल्यामुळे वापस केल्या जात आहे.

या दोन्ही कोविड रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. तरीही ती कमी पडत आहे. अचलपूर कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ५० बेडवरून ६५ बेड लावण्यात आले आहेत. भामकर कोविड रुग्णालयात ४१ बेडवरून ६२ बेड लावण्यात आले आहेत. तरीही हे बेड रुग्ण संख्या बघता कमी पडत आहे. यात बेडअभावी रुग्णांची फरफट होत आहे.

दरम्यान कुटीर रुग्णालयात बेडसंख्या दहाने वाढविण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर आरोग्य यंत्रणेने चालविले आहेत. याकरिता तेथे असणारा कोरोना टेस्ट विभाग कल्याण मंडपम येथे हलविण्यात आला आहे. मकर कोविड रुग्णालय इमारतीच्या खालच्या भागात अजून वाढीव ४० ते ५० बेड लावण्याकरिता तयारी सुरू आहे. आरोग्य विभागाकडून परवानगी मिळताच हे वाढीव बेड कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

रेमडेसिविरकरिता नातेवाईकांची भटकंती

कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसीविर, उपचारकर्त्या डॉक्टरांनी तात्काळ द्यावी, याकरिता रुग्णांच्या नातेवाईकांचा आग्रह अधिक बघायला मिळत आहे. याकरिता त्यांना भटकंती करावी लागत आहे. परतवाडा येथे उपचारार्थ दाखल रुग्ण डॉक्टरांच्या चिठ्ठ्या घेऊन अमरावती येथील पंजाबराव मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन रांग लावतात. तेथे काहींना ते इंजेक्शन उपलब्ध होते. काहींना खालीहात परतावे लागत आहे.

परिस्थिती गंभीर

आजही ग्रामीण भागात कोरोना रुग्णांकडून औषधोपचाराच्या अनुषंगाने दुर्लक्ष केले जात आहे.

परिस्थिती विदारक

अनेकजण आजार घरीच अंगावर काढत आहेत. यात प्रकृती अधिक बिघडल्यानंतर ते दवाखान्याच्या दिशेने वळतात. पण यात काहींना दवाखान्यापर्यंत पोहोचण्याची संधीसुद्धा कोरोना मिळू देत नाही. यात काहींचे दवाखान्यात आणताना रस्त्यातच किंवा दवाखान्याच्या पायरीवर निधन होत आहे. यात परतवाडा शहरात तीन दिवसांत घडलेल्या काही घटना अधिक विदारक ठरल्या आहेत.

रात्री ३ वाजता अंत्यसंस्कार

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस स्टेशन अंतर्गत जनुना गावातील ५० वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा रुग्णालयाबाहेर वाटेतच तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यास उपचारार्थ कुटीर रुग्णालय अचलपूर येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच नातेवाईकांनी त्यास खासगी दवाखान्यात नेत असल्याचे सांगून ताब्यात घेतले. रुग्णाला उपचारार्थ अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर हा मृतदेह गावकरी गावात येऊ देणार नाही. म्हणून त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला. दरम्यान संबंधितांनी त्याच रुग्णवाहिकेतून तो मृतदेह कुटीर रुग्णालयात आणला. मृताच्या एका नातेवाईकाने व रुग्णवाहिकेच्या चालकाने पीपीई किट घालून बाजूलाच असलेल्या हिंदू स्मशानभूमीत तो मृतदेह नेला. तेवढ्याच रात्री ३ ते ४ वाजता दरम्यान त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले.

Web Title: Kovid Hospital Housefull with cemetery in the backyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.