बेनोडा येथे कोविड रुग्णालय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:59+5:302021-05-21T04:13:59+5:30
वरूड / बेनोडा : तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बेनोडा शहीद येथे ऑक्सिजनयुक्त ५० खाटांचे कोविड ...
वरूड / बेनोडा : तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बेनोडा शहीद येथे ऑक्सिजनयुक्त ५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू झाले आहे. तेथे कोरोनाबाधितांवर उपचारदेखील होत असल्याने परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
अन्य तालुक्यांच्या तुलनेत वरूड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. नागपूर व अमरावतीलादेखील खाटा उपलब्ध होत नसल्याने कोविड रुग्णांसह नातेवाइकांची चांगलीच ससेहोलपट होते. अनेकांनी प्राणसुद्धा गमावले. याकरिता बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू होऊन गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम यांनी रुग्णालयाची पाहणीअंती समाधान व्यक्त केले. १७ मे रोजी कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले.
नोडल अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, बेनोडा वैद्यकीय अधिकारी सोहेल खान, सहायक नोडल अधिकरी सुधाकर राऊत यांनी काम पूर्ण करून येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ३१ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली असून, सुसज्ज कोविड रुग्णालयात एक फिजिशियन, हृदयरोगतज्ज्ञ, एक एमबीबीएस डॉक्टर, २ बीएएमएस डॉक्टर, ११ एएनएम, ६ सफाई कामगार, १० कक्ष सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी पहिला कोविड रुग्ण दाखल करून घेऊन उपचार सुरू झाले.