कोयता, चाकूचे ३२ वार युवकाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:36+5:30
चित्रा चौकातील अवी मेडिकलसमोर घडली. जुन्या वादातून धारदार शस्त्राचे ३२ वार करण्यात आले. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. एका अल्पवयीनालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोयता व चाकूने शरीरावर सपासप वार करून युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना प्रजासत्ताक दिनी रात्री ८.२० वाजताच्या सुमारास चित्रा चौकातील अवी मेडिकलसमोर घडली. जुन्या वादातून धारदार शस्त्राचे ३२ वार करण्यात आले. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. एका अल्पवयीनालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
मनीष कन्हैयालाल गुप्ता (३२, रा. विलासनगर) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये विशाल विजयसिंह परिहार (२०), सुरेश जयसिंह चांदणे (२०), आदेश प्रमोद सावंत (२०), पवन मोरेश्वर सोळंके (२४, सर्व रा. विलासनगर), किरण कमलेश शेवणे (२३), भारत ऊर्फ मख्खी अर्जुन घुगे (२०) यांचा समावेश आहे. एका अल्पवयीनाला या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्व आरोपींविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी कलम ३०७, ३०२, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. याप्रकरणी मृताचा भाऊ शीतल कन्हैयालाल गुप्ता (४०, रा. विलासनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
पोलीस सूत्रांनुसार, किरण शेवणेचा भाऊ शरद शेवणे व मृत मनीष यांच्यात वर्षभरापूर्वी भांडण झाले होते. मनीषने शरदवर चाकूने वार केल्याने त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याला अटक करून तडीपार करण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी मनीषचे भारत घुगे याच्याशीही पानटपरीवर भांडण झाले होते. अल्पवयीन आरोपीलाही त्याने मारहाण केली होती. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी रविवारी सातही आरोपींनी मनीषला चित्रा चौकात गाठले व त्याच्या शरीरावर कोयता-चाकूने ३२ वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनीषला नातेवाईक, नागरिक व पोलिसांच्या मदतीने प्रथम इर्विन रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला राजापेठ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारदरम्यान रात्री १२.४५ वाजता त्याचा मृत्यू झाला.
शहर कोतवाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे, उपनिरीक्षक गजानन राजमलु, राजेंद्र चाटे, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र उमक, डीबी पथकाचे अब्दुल कलाम, नायक पोलीस कॉन्स्टेबल नीलेश जुनघरे, जुनेद खान, इम्रान खान, आशिष विघे, गजानन ढेवले, विनोद मालवे, अमोल यादव, सागर ठाकरे, मनीष सावरकर यांच्या पथकाने पंचनामा केला व आरोपींचा माग घेतला.
जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली. एक अल्पवयीन ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
- शिवाजी बचाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली ठाणे