कुऱ्ह्यात अवतरले पंढरपूर !
By admin | Published: November 26, 2015 12:09 AM2015-11-26T00:09:32+5:302015-11-26T00:09:32+5:30
देहभान विसरुन फक्त पांडुरंगाच्या दर्शनाचा एकच ध्यास, माऊलीवर असणारी नितांत श्रध्दा व अपार पे्रम व्यक्त करण्यासाठी हा विठ्ठल भक्तांचा अट्टाहास.
मनोहारी रिंगण सोहळा : विठूरायाच्या जयघोषात रमल्या पालख्या
रोशन कडू तिवसा
देहभान विसरुन फक्त पांडुरंगाच्या दर्शनाचा एकच ध्यास, माऊलीवर असणारी नितांत श्रध्दा व अपार पे्रम व्यक्त करण्यासाठी हा विठ्ठल भक्तांचा अट्टाहास. प्रत्यक्ष पांडुरंगच विदर्भाच्या पंढरीत म्हणजे श्रीक्षेत्र कौंडण्यपूरात दीड दिवसांचा मुक्काम करणार असल्याने पालख्यांची आणि वारकऱ्यांची लगबग चालली होती. ज्या प्रमाणे वाखरी पंढरपूर रिंगण सोहळा असतो त्याप्रमाणे कुऱ्हा येथे बुधवारी दुपारी रिंग्ांण सोहळा पार पडला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याचे यंदाचे आठवे वर्ष आहे.
विदर्भाची पंढरी कौंडण्यपूर येथे कार्तिक एकादशी प्रतिपदेला दहिहंडी सोहळा असतो. प्रत्यक्ष पांडुरंगच या दिवशी कौंडण्यपूरला मुक्कामी असल्याने विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून ५० वर दिंड्या कौंडण्यपूरला यायला निघाल्या आहेत. या सर्व दिंड्यांचा रिंंगण सोहळा बुधवारी कुऱ्हा येथील पटांगणात हभप रंगराव महाराज टापरे यांच्या मार्गदर्शनात पार पडला कुऱ्ह्यावासी दरवर्षी मोठ्या आपुलकीने या रिंंगण सोहळ्याचे आयोजन करतात.
या रिंगण सोहळ्याला आमदार यशोमती ठाकूर, माजी आ.साहेबराव तट्टे, पं.स. सभापती अर्चना वेरूळकर, अच्युत महाराज सत्संग परिवाराचे अध्यक्ष सुधीर दिवे, किरण पातुरकर, दिलीप निंभोरकर, शिवराय कुळकर्णी, संदीप गिरासे, दिलीप काळबांडे, विजय नहाटे, मंगेश भगोले, उज्ज्वला पांडव, मुकेश केने व्यासपीठावर उपस्थित होते.
या पालख्यांचा सोहळ्यात सहभाग
रिंंगण सोहळ्याला जय हनुमान संस्थान आखतवाडा, जिल्हा अकोला, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान बाळापूर, श्री वाल्मिकी मंडळ चेचरवाडी, राधाकृष्ण महिला मंडळ चेनुष्ठा, श्री हनुमान सांप्रदायिक भजनी मंडळ, शिंगणवाडी, जय हनुमान मंडळ समरसपूर शिरसोली, श्रीक्षेत्र ऋणमोचन, बापूराव महाराज संस्थान, श्री गोपाल महाराज अंबाडकर मार्कंडा, श्री क्षेत्र वारकरी संप्रदाय नांदेड बुजरुक, शारदा महिला मंडळ नांदेड, श्री मुक्ताबाई भजनी मंडळ बाभळी, श्री विठ्ठल संस्थान वासनी, श्री विठ्ठल रुक्मिणी सांप्रदायिक भजनी मंडळ अमरावती, गजानन महाराज महिला मंडळ हिवरखेड, श्री ज्ञानेश्वर महिला मंडळ भातकुली, ज्ञानेश्वर माऊली संस्थान करजगाव, श्री जयराम बाबा संस्थान रामा, शिवशंकर संस्थान शिंगणवाडी, नामदेव महाराज म्हातोली, जय हनुमान संस्थान घातखेडा आदी पालख्यांचा सहभाग होता.
आबालवृध्दांचा सहभाग
पालखी रिंंगण सोहळ्याची मूळ संकल्पना अकोला जिल्ह्यातील आखतवाडा येथील हभप रंगराव महाराज टापरे यांची आहे. त्यांच्या संकल्पनेला कुऱ्हा येथील सर्व पक्ष, सर्व धर्माच्या लोकांनी तन-मन-धनाने सहकार्य केले आहे. नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचे यंदाचे आठवे वर्ष आहे. या पालख्यांमध्ये आबालवृध्द उत्साहाने सहभागी होतात.
कार्तिकी पौर्णिमेला कौंडण्यपूर येथे जाणाऱ्या सर्व दिंड्या व पालख्या कुऱ्हा ते तिवसा राज्य महामार्गावर तिवसा येथे थांबतात. यंदाही रिंगण दिंडी समितीद्वारे त्यांचे स्वागत करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारच्या सुमारास ह्या सर्व पालख्या मैदानात असलेल्या रिंंगणातून विठूरायाचा गजर करीत कौंडण्यपूरकडे मार्गस्थ झाल्या. अत्यंत भारावलेल्या व भक्तीमय वातावरणात या पालख्यांना निरोप देण्यात आला.