‘त्या’ लॅब टेक्निशियनला १० वर्षांचा कारावास, भलत्याच ठिकाणचा घेतला होता स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 04:59 PM2022-02-03T16:59:31+5:302022-02-03T17:03:56+5:30
कोरोना चाचणीसाठी एका लॅब टेक्निशियनने तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याचा प्रकार अमरावतीत घडला होता. या प्रकरणात आरोपी लॅब टेक्निशियनला अटक करण्यात आली होती. आता या आरोपीला न्यायालयाने १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली
अमरावती : कोरोना चाचणीसाठी नाकातून किंवा तोंडातील स्वॅब न घेता, अन्य ठिकाणचा स्वॅब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला स्थानिक न्यायालयाने १० वर्षे कारावास, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, तर विनयभंगाच्या कलमान्वये ५ वर्षे शिक्षा, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास ठोठावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ व्ही. एस. गायकी यांनी २ फेब्रुवारी रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
विधीसूत्रानुसार, अल्केश अशोक देशमुख (३२, रा. पुसदा, ता. अमरावती) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. २८ जुलै २०२० रोजी बडनेरा स्थित मोदी ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली होती. एका स्टोअरमध्ये कार्यरत महिला कोरोना चाचणीसाठी मोदी हॉस्पिटलमध्ये गेली होती. तेथे आरोपीने तिचा स्वॅब घेतला. लगेचच पॉझिटिव्ह आल्याचे सांगत गुप्तांगातून स्वॅब घ्यावा लागेल, असे सुचविले. महिला कर्मचारी नसल्याचे सांगून अल्केशने आतील खोलीत नेऊन तिचा भलत्याच ठिकाणचा स्वॅब घेतला. तिने ही बाब तिच्या भावाला सांगितली. त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारणा केली असता अशी कोणतीही चाचणी गुप्तांगाद्वारे होत नसल्याचे सांगण्यात आले.
आरोपीने पीडिताच्या मोबाईलवर आक्षोपार्ह संदेशदेखील टाकले. त्यामुळे तिने बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली. त्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६ क, ड, ३५४ व ॲट्राॅसिटी अन्वये गुन्हा दाखल केला. सहायक सरकारी वकील सुनील देशमुख यांनी १२ साक्षीदार तपासले. साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीला सर्व कलमान्वये दोषी ठरविण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून नापोकॉ अरुण हटवार यांनी काम पाहिले.