जिल्ह्यात रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती घटली
By जितेंद्र दखने | Published: April 2, 2024 10:17 PM2024-04-02T22:17:00+5:302024-04-02T22:17:15+5:30
१,१३० कामावर केवळ ९ हजार ८२६ मजूर
अमरावती: जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ३४४ ग्रामपंचायत व यंत्रणा मिळून १ हजार १३० कामे सुरू आहेत. या कामावर २ एप्रिल रोजी ९ हजार ८२६ मजुरांची उपस्थिती आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे आटोपली आहे. मात्र, अशातच दुसरीकडे रोहयोवरील मजुरांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात घटली आहे.
शासनाकडून स्थानिक पातळीवर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. दरवर्षी या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असतो. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते, जलसंवर्धन, सिंचन विहिरी, वृक्षारोपण, रोपवाटिका यासह विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम उद्योग, ग्रामपंचायत, कृषिविभाग, सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या वतीने मजुरांमार्फत कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या वृक्षलागवड, बांबू लागवड, सिंचन विहीर, वैयक्तिक वृक्षलागवड, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, रस्ते, शेततळे, फळबाग लागवड, शोषखड्डे, गांडूळ खत निर्माती, घरकूल, पेव्हर ब्लॉक, शाळा इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना, शाळा शौचालय, शाळा संरक्षक भिंत, शाळा परिसरात काँक्रीट नाला बांधकाम, शेततळी, रस्ते, रोपवाटिका, रेशीम उद्योग अशी कामे करण्यात येत आहेत. मात्र, रोहयोच्या कामावरील हजारो मजुरांच्या मजुरीचा मोबदला गत तीन महिन्यांपासून मिळाला नसल्याने मजुरांनीही रोहयोच्या कामावर पाठ फिरविली आहे.
रोजगाराची हमी देणारी रोजगार हमी योजना
सन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनेची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केली. त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठरावीक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते.
तालुका - कामे - मजूर उपस्थिती
अचलपूर - ९३ - ८३९
अमरावती - ८२ - ५०७
अंजनगाव सुजी - २३ - १२६
भातकुली - १४ - ९६
चांदूर रेल्वे - ३२ - १४१
चांदूर बाजार - ८२ - ४९३
चिखलदरा - १८४ - २,६०५
दर्यापूर - ६७ - ३१७
धामनगांव रेल्वे - ३७ - २२५
धारणी - १२६ - १,३३६
मोर्शी - ६९ - १,१११
नांदगाव खंडेश्वर - ९२ - ४६९
तिवसा - ४७ - ३४७
वरुड - १८२ - १,२१४
मार्च महिन्यात होती १ लाखावर मजूर उपस्थिती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर गत ६ मार्चपर्यंत जिल्हाभरात ५ हजार ५६९ कामावर सुमारे १ लाख ४६९ एवढे मजूर उपस्थित होते. होळीपासून मात्र रोहयोवरील मजुरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात घटली आहे. आजघडीला ही मजूर उपस्थित १० हजारांच्या आत असून कामांची संख्या १,१३० एवढीच आहे. येत्या १० एप्रिलनंतर रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती व कामांची संख्याही वाढण्याची शक्यता रोहयो विभागाकडून वर्तविली आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध आहे. होळी सणामुळे कामावरील मजुरांची संख्या कमी झाली आहे. येत्या १० एप्रिलनंतर राेजगार हमी योजनेच्या कामे व मजूर उपस्थिती वाढेल.- श्रीराम कुलकर्णी, डेप्युटी सीईओ (रोहयो)