अमरावतीत मजुराची ‘लक्ष्मी’ पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण
By गणेश वासनिक | Published: August 6, 2024 03:02 PM2024-08-06T15:02:56+5:302024-08-06T15:04:10+5:30
Amravati : आमदारांकडून मुलीसह आई-वडिलांचा सत्कार, मारुतीनगरात रस्ता बांधकामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर
अमरावती : मनात जिद्द अन् चिकाटी असली तर कोणतेही ध्येय, उद्दिष्ट गाठता येते. यात परिस्थिती आड येत नाही, ही बाब एका मजुराच्या मुलीने एमपीएससीतून पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सिद्ध केली आहे. लक्ष्मी राजेश तेलंग असे या मुलीचे नाव असून वडील बांधकाम सेंट्रिग मजूर तर आई मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवितात, हे विशेष.
अमरावतीच्या महाजनपुरा भागातील मारुतीनगर येथील रहिवासी असलेल्या राजेश तेलंग यांची कन्या लक्ष्मी हिने अत्यंत विपरीत परिस्थितीवर मात करून पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण करून तेलंग परिवाराची शान वाढविली आहे. तिच्या यशामुळे आजीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ‘लक्ष्मी’ हिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आमदार रवी राणा हे मारुतीनगरात पोहोचले. आई-वडिलांसह लक्ष्मीचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच लक्ष्मी हिच्या घरच्या परिसरातील रस्ता खराब असल्याने या रस्ता दुरुस्तीसाठी आमदार रवी राणा यांनी दिला १० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर केला.
यावेळी आमदार रवी राणा यांच्या समवेत भूषण पाटणे, पराग चिमोटे, नाना सावरकर, अविनाश काळे, गणेशदास गायकवाड, कृष्णा तेलंग, नेहा तेलंग, सुमन तेलंग, उषा तेलंग, राजेश तेलंग, शीला तेलंग, रोहित तेलंग, सागर तेलंग आदी उपस्थित होते.