मजुरांच्या पिकअपची ट्रकला भीषण धडक; पाच ठार, आठ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2023 10:42 PM2023-02-01T22:42:41+5:302023-02-01T22:43:02+5:30
Amravati News मेळघाटातील धारणी तालुक्याला लागून असलेल्या अकोट परिसरातून काम करून गावी परतणाऱ्या मध्य प्रदेशातील मजुरांच्या वाहनाला देढतलाई शेखपुरा येथे अपघात झाला.
अमरावती : मेळघाटातील धारणी तालुक्याला लागून असलेल्या अकोट परिसरातून काम करून गावी परतणाऱ्या मध्य प्रदेशातील मजुरांच्या वाहनाला देढतलाई शेखपुरा येथे अपघात झाला. उसाचा ट्रक आणि पिकअप वाहन यांच्यात बुधवारी दुपारी २:३० वाजता ही भीषण धडक झाली. यात पाच मजूर ठार झाले, तर आठ गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १२ व १४ वर्षे वयाच्या मुलींचा समावेश आहे. अपघातातील सर्व मृत व जखमी हे मध्य प्रदेशातील सुंदरदेव येथील असल्याची माहिती खकनार पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली. तापी नदीजवळ झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, मजुरांनी भरलेले पिकअप वाहन चक्काचूर झाले.
पार्वती रामसिंग दिनकर (३२), नंदनी रामसिंग दिनकर (१२), दुर्गा कालू तंडीलकर (१४), रमेश मंगल (३५), जामवंती रमेश (३२, सर्व रा. सुंदरदेव, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. बसंती श्रीराम (४५), गणेश रामचंद्र (१०), दारासिंग श्रीराम (७), रवींद्र रमेश (१०), मुन्नीबाई रामचंद्र (४८), रामसिंग मोतीलाल (४०), कौशल्या श्रीकेश (१५), जगन कमल (१३), चंद्राबाई नानकराम (३५) अशी जखमींची नावे आहेत.
अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरात शेतीसह इतर कामांसाठी मध्य प्रदेशातील मजूर आले होते. काम आटोपल्याने बुधवारी त्यांना घेऊन पिकअप वाहन सुंदरदेवकडे जात होते. मध्य प्रदेशातील देडतलाई शेखपुराकडे जाणारा उसाचा ट्रक (एमपी ०९ - केडी १७२३) आणि पिकअप यांच्यात भीषण धडक झाली. नेपानगरच्या आमदार सुमित्रा कासदेकर, डॉ. राजेश कासदेकर, नगरसेवक इरफान कुरेशी, सचिन मंडलकर, रशीद खान यांनी घटनास्थळाहून रुग्णवाहिकेद्वारे जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अपघातात पाच जण ठार झाले आहेत. आठ जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास खकनार पोलिस करीत आहेत.
- संजय पाठक, ठाणेदार, खकनार (मध्य प्रदेश)