होय साहेब! मी मग्रारोहयोचा मजूर, सांगा माझं काय चुकलं? अडकलेल्या वेतनासाठी कवितेतून मांडली व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 11:56 AM2022-06-01T11:56:56+5:302022-06-01T12:26:29+5:30
आमच्या मजुरीकरिता कोणी बोलायला तयार नाही. कधी मिळेल आमची मजुरी, कोणी उचलणार आमचा प्रश्न.. तुम्हीच सांगा साहेब आमचं काय चुकलं? असा प्रश्न त्याने या कवितेतून उपस्थित केलाय.
अमरावती : मेळघाटात मग्रारोहयोचे १८ कोटी रुपये थकित असून मजुरांना अद्याप मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे, अनेक कुटुंबांचे हाल होत असून एका मजुराने कवितेच्या माध्यमातून शासन, प्रशासनाकडे आपली व्यथा मांडली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर, गोरगरिबांच्या पोटाचा घास अडला असून प्रशासनाला मात्र अजूनही घाम फुटला नसल्याचे संतापजनक चित्र आहे.
होय साहेब! मी मग्रारोहयोचा मजूर.. तुम्ही सांगा साहेब माझं काय चुकलं.. म्हणत मजुराने आपली व्यथा मांडली आहे. कोणी चालीसा वाचत आहे.. कोणी भोंगे काढत आहे.. जाती धर्मात भेदभाव निर्माण होईल, अशा विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडं वेळ आहे; पण आज आदिवासी, शोषित, पीडित, मजुराच्या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाही. सांगा साहेब त्यात आमचं काय चुकलं... असा प्रश्न त्याने या कवितेतून उपस्थित केलाय.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील अकुशल मजुरीचे १५ हजार मजूर आहेत. १८ कोटी रुपये अडकले असून काही बँकेचे अकाउंट तर काही शंभर दिवस देयक प्रलंबित आहे. त्यावर कोणी बोलायला तयार नाही... कोणी आवाज उचलणार की आम्ही काम करून चूक केली तुम्ही सांगा साहेब आमचं काय चुकलं...
साहेब तुम्ही मत घेऊन मोठमोठ्या गाडीने हिंडत असून एसी लावून तुम्ही फिरत आहेत. तुमच्या हिश्श्यात विकासनिधी कमी आला की धिंगाणा घालता... आमच्या मजुरीकरिता कोणी बोलायला तयार नाही. कधी मिळेल आमची मजुरी कोणी उचलणार आमचा प्रश्न तुम्हीच सांगा साहेब आमचं काय चुकलं... गटविकास अधिकारी/तहसीलदार यांच्या आदेशाने आम्ही गोठा, सिंचन विहीर बांधकाम केले ... दागिने गहाण ठेवले/बैल जोड्या विकल्या आता काय विकू साहेब तुम्हीच सांगा आमचं काय चुकलं.. असे म्हणत त्याने कवितेच्या माध्यमातून शासनाकडे मजुरीसाठी व्यथा सांगत विनंती केलीये.
नागपूर आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांचा डेरा
नागपूर येथे मग्रारोहयोचे आयुक्त कार्यालय आहे. तेथे मेळघाटातील आदिवासींच्या या वेतनासंदर्भात महसूल विभाग व पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मजुराचे तत्काळ वेतन मिळावे, यासाठी प्रशासकीय स्तरावर जोरदार हालचाली सुरू असून त्यासंदर्भात जिल्हा समन्वयक अनंत घुगे, एपीओ आशिष काळे, रुपेश ऑडिओकर, नितीन शिरभाते, राजू धांडे, रवी धांडे, अतुल जयसिंगपुरे, राहुल सेमलकर यासह संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या व तत्काळ वेतनासाठी तळ ठोकला आहे.