कोरोना संक्रमण काळात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अभाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:59+5:30
पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नीट न करणे, त्यांना स्वत:हून संपर्क न करणे, आणि त्यांच्या टेस्ट न करणे, ही कारणे समोर आली आहेत. दाटीवाटीने वस्ती असणाऱ्या भागांमध्ये, झोपडपट्टयांमध्ये सॅनिटेशन आणि स्वच्छता योग्य त्या प्रमाणात न करणे, शासकीय यंत्रणांमध्ये सुसुत्रतेचा अभाव प्राधान्याने दिसून आला आहे. नगरपालिका वा आरोग्य यंत्रणेकडून आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले नसल्याची ओरड आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : अमरावती शहरापुरता मर्यादित असलेल्या कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. पाहता पाहता वरूड तालुक्यातील कोरोना संक्रमितांची संख्या २०० पार गेली आहे. या कालावधीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अभाव व लोकांचा निष्काळजीपणा प्रकर्षाने समोर आला आहे.
पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नीट न करणे, त्यांना स्वत:हून संपर्क न करणे, आणि त्यांच्या टेस्ट न करणे, ही कारणे समोर आली आहेत. दाटीवाटीने वस्ती असणाऱ्या भागांमध्ये, झोपडपट्टयांमध्ये सॅनिटेशन आणि स्वच्छता योग्य त्या प्रमाणात न करणे, शासकीय यंत्रणांमध्ये सुसुत्रतेचा अभाव प्राधान्याने दिसून आला आहे. नगरपालिका वा आरोग्य यंत्रणेकडून आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले नसल्याची ओरड आहे.
मार्चपासून पाच महिने येथील अधिकाऱ्यांनी भक्कम बाजू सांभाळल्याने कोरोना केवळ पाचवर स्थिरावला होता. मात्र, अनलॉक ४ मध्ये हा आकडा २०० पार गेला आहे. येथून नागपूरला उपचारासाठी गेलेल्या रुग्णांची अमरावतीमध्ये नोंद होत नसल्याने वरूडमधील कोरोनाचा संसर्गित व्यक्ती व मृत्युच्या संख्येत एकवाक्यता नाही. ती माहिती अमरावती प्रशासनाला मिळत नसल्याने आंतरजिल्हा समन्वयाचा आभाव दिसून येतो. त्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट शोधण्यास त्रास होऊन पयार्याने रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अलिकडे तालुक्यात कोरोना संक्रमणाचा आकडा वाढला असताना आरोग्य यंत्रणेला पॉझिटिव्ह व्यक्तींचे कॉन्टॅक्ट पर्सन शोधण्यास मर्यादा आल्याचे बोलले जात आहे. कंटेन्मेनट झोनही आता आकुंचण पावले आहेत. बाजारात गर्दी रोज नवनवा उच्चांक गाठत आहे.
अशी आहे परिस्थिती
नागपूरमध्ये वरुड येथील चार रुग्ण कोरोनामुळे दगावले. परंतु त्यांचे कॉन्टॅक्ट पर्सन शोधण्यात आले नाहीत. येथील ग्रामीण रुग्णालयातही दोघांचा मृत्यू झाला. आता गर्दी आणि संपर्क वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख, तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार मगन मेहते, मुख्याधिकारी रवींद्र पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, बिडीओ वासुदेव कणाटे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र एका दिवशी २५ ते ५० च्या घरात रूग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
तालुक्यात रुग्णवाहिकांचा तुटवडा
कोरोना रुग्नांकरिता आॅक्सिजन पुरवठा यंत्रणेसह रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे. परंतु खासगीमध्ये दोन आणि शासकीयमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाच आणि ग्रामीण रुग्णालयाच्या दोन रुग्णवाहिका आहत. एक १०८ रुग्णवाहिका आह. केवळ १०८ रूग्णवाहिकाच सुसज्ज आहे. ती सतत व्यस्त असते. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी रुग्णाला प्राण गमवावा लागतो. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने वाढीव व सुसज्ज रुग्णवाहिका द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क व लोरिस्कमध्ये असलेल्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.