क्वारंटाइन सेंटरवर सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:02+5:30

पाण्याची व्यवस्था असली तरी जेवणाचा डबा घरू बोलावण्याचे फर्मान काढले आहे. यासंबंधी तक्रार केली किंवा त्या गैरव्यवस्थेत, डासांच्या साम्राज्यात क्वारंटाईन होण्यास नकार दिला की, सरळ गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे.

Lack of facilities at the quarantine center | क्वारंटाइन सेंटरवर सुविधांचा अभाव

क्वारंटाइन सेंटरवर सुविधांचा अभाव

googlenewsNext
ठळक मुद्देअचलपूर तालुका : पैसे मोजा अन् क्वारंटाइन व्हा; नाही तर शाळेवर जा!

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील क्वारंटाइन केंद्रांवर सुविधांचा अभाव बघायला मिळत आहे.
बिछायत केंद्रावरील बेडशीट नसलेल्या मळक्या गाद्या अन् त्यावर तशीच उशी, शाळेत एकच बकेट अन् एकच शौचालय, पाणी प्यायला रांजणाची स्थितीही वेगळी नाही. ना जेवणाची व्यवस्था, ना चहापानाची. पाण्याची व्यवस्था असली तरी जेवणाचा डबा घरू बोलावण्याचे फर्मान काढले आहे. यासंबंधी तक्रार केली किंवा त्या गैरव्यवस्थेत, डासांच्या साम्राज्यात क्वारंटाईन होण्यास नकार दिला की, सरळ गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे.
दरम्यान, शाळेत, केंद्रावर आहे ती व्यवस्था मान्य नसेल, तर पैसे मोजा अन् हॉटेलवर क्वारंटाइन व्हा, असा फंडा प्रशासनाने अमलात आणला आहे. पैसे नसतील, तर शाळेवर गुमान क्वारंटाइन व्हा, असा फतवाच यंत्रणेने काढला आहे. यामुळे क्वारंटाइन होऊ इच्छिणाऱ्यांसह त्यांचे पालक चिंताग्रस्त झाले आहेत.
क्वारंटाइन केंद्र गावाबाहेर, गर्दीपासून दूर असावे, असे सर्वमान्य संकेत असताना, मध्यवस्तीत, मुख्य रस्त्यालगतची शाळाही क्वारंटाइन केंद्राकरिता घेण्यात आली आहे. त्यापैकी असलेल्या कांडलीत भंसाली कॉन्व्हेंटला साधी कुंपणभिंतही नाही.
ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शाळेवर क्वारंटाइन होणाºयाला घरू न बेड, बिछाना आणावा लागत आहे. खोलीत जमिनीवर तेवढी सतरंजी काही ठिकाणी दिली जात आहे. क्वारंटाइन सेंटरवर सॅनिटायझर नाही, साबणही नाही आणि निर्जंतुकीकरणाचा तर येथे नावालाही गंध नाही.

क्वारंटाइन केंद्रे वाढली
अचलपूर नगरपालिका क्षेत्रांतर्गत क्वारंटाइन केेंद्रात वाढ करण्यात आली आहे. म्युनिसिपल हायस्कूलसह कल्याण मंडपमध्येही क्वारंटाइन केंद्र उभारण्यात आले आहे. म्युनिसिपल हायस्कूलवर ३६ बेड आणि कल्याण मंडपम्मध्ये ६४ बेड टाकण्यात आले आहेत. याकरिता शासकीय वसतिगृहातील पलंग आणि बिछायत केंद्रावरील गाद्यांचा वापर करण्यात आला आहे. शहराबाहेर अंजनगाव रोडवर असलेले अग्रसेन भवनही नगर परिषदेने क्वारंटाईन केंद्राकरिता मिळवले आहे. ज्यांना या क्वारंटाइन केंद्रावर राहायचे नाही, त्यांच्याकरिता नगर परिषदेने शहरातील आरवो आणि भवानी हॉटेलवर व्यवस्था केली आहे. पण, हॉटेलवर क्वारंटाइन होणाऱ्यांना त्या हॉटेलचे भाडे मोजावे लागणार नाही.

कांडलीकरिता गुलाबबाग
कांडली ग्रामपंचायतने अचलपूर रोडवरील शहरातील गुलाब बाग पॅलेस क्वारंटाइनकरिता घेतले आहे. ज्यांना गुलाब बागमध्ये क्वारंटाइन व्हायचे आहे, त्यांना तेथे पैसे मोजावे लागत आहेत.

क्वारंटाइन केंद्रावर बिछान्यासह जेवणाचे डबे स्वत: आणावे लागतील. शाळेव्यतिरिक्त अन्य खाजगी केंद्रांवर क्वारंटाइन होताना पैसे मोजावे लागणार आहेत.
-जयंत बाबरे, गटविकास अधिकारी

देवमाळीकरिता फातिमा कॉन्व्हेंट
देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत क्वारंटाइनकरिता फातिमा कॉन्व्हेंट अधिग्रहित करण्यात आली आहे. या कॉन्व्हेंटमध्ये क्वारंटाइन होणाऱ्यांना आपल्या घरू नच बिछान्यासह जेवणही आणावे लागत आहे.

Web Title: Lack of facilities at the quarantine center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.