आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, त्यात दुपारी केंद्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:24+5:302021-06-18T04:09:24+5:30
फोटो पी १७ पुसला असाईनमेंट संजय खासबागे वरूड : तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २२ आरोग्य ...
फोटो पी १७ पुसला
असाईनमेंट
संजय खासबागे
वरूड : तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २२ आरोग्य उपकेंद्रे आहेत. परंतु, आरोग्य विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीची पदे रिक्त असल्याने ग्रामीण नागरिकांना वेळीच आरोग्य सुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. सहापैकी केवळ पुसला आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ असून, पाच आरोग्य केंद्रांतील पदे रिक्त आहे. औषधनिर्मात्याची आठ पदांपैकी सहा रिक्त आहे, दोन उपकेंद्रांमध्ये कार्यरत आहेत. पुसला प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली असून, डागडुजीवर टिकून आहे. सकाळी उघडलेली आरोग्य केंद्रे दुपारी बंद असतात, सायंकाळी उघडतात. यामुळे आरोग्य केंद्रे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. केवळ आमनेर आणि बेनोडा आरोग्य केंद्रातच उपचार होत असून, बाह्य आणि आंतर रुग्ण विभाग फुगलेला दिसतो. उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर किंवा अपघाती रुग्ण गेल्यास ‘रेफर टू वरूड’ असा प्रवास सुरू आहे. यामुळे वरूड ग्रामीण रुग्णालयावर अधिक भार वाढत आहे.
अडीच लाख लोकसंख्येचा वरूड तालुक्यात ग्रामीण रुग्णालयासह यामध्ये शेंदूरजनाघाट, पुसला, राजुरा बाजार, लोणी, आमनेर, बेनोडा (शहीद) ही सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शेंदूरजनाघाट, टेम्भूरखेडा, धनोडी, राजुरा बाजार, हातुर्णा, गाडेगाव, पवनी, पुसला, लिंगा, बेनोडा, जरूड १ आणि २, लोणी, इत्तमगाव, करजगाव, मांगरुळी, झोलंबा, आमनेर, एकदरा, वाठोडा, सुरळी, ढगा या २२ उपकेंद्रांचा समावेश आहे. आरोग्य केंद्रांत सहा एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, तर उपकेंद्रांमध्ये २२ सामुदायिक आरोग्य अधिकारी (सीएचओ) सेवा देत आहे. असे असले तरी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषधनिर्माता, परिचर आदी पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येतो. प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ लसीकरण, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आणि प्रसूतीपुरतेच मर्यादित राहिले असून, गंभीर किंवा अपघाती रुग्णावर उपचार होत नाही, तर सरळ ‘रेफर टू वरूड’ असा प्रवास सुरू असतो. जरूड आणि मांगरूळी उपकेंद्रांतील डिस्पेन्सरीमध्ये औषधनिर्माता आहेत, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या सहा पदांपैकी केवळ पुसला आरोग्य केंद्रात पद भरले आहे. आंतररुग्ण बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण दाखल असतात. आरोग्य केराच्या इमारतीसुद्धा मोडकळीस आल्या असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. केवळ आमनेर आणि बेनोडा येथे सुसज्ज अशी इमारत आहे. पुसला आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली आहे. लोणी, राजुराबाजार आणि शेंदूरजनाघाट येथील इमारतींची देखभाल-दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जात नाही. ग्रामीण आरोग्य सेवा तोकड्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे मोडकळीस आली आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून, शासनाने ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्याची गरज आहे.
बॉक्स
तालुक्यात सहा आरोग्य केंद्रे आणि २२ उपकेंद्रे आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असली तरी आम्ही रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करतो. महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कोविडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगली साथ दिली.
- डॉ. अमोल देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी