सावंगा विठोबात लोटला भक्तांचा सागर

By Admin | Published: April 9, 2016 12:08 AM2016-04-09T00:08:57+5:302016-04-09T00:08:57+5:30

साडेतीनशे वर्षांपूर्वी अवधुती सांप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणारे कृष्णाजी महाराजांमुळे पावन झालेल्या सावंगा विठोबा नगरीत ...

Laga bhakta ocean in Savgaa Vithoba | सावंगा विठोबात लोटला भक्तांचा सागर

सावंगा विठोबात लोटला भक्तांचा सागर

googlenewsNext

लाखो रुपयांची कापूरज्योत : कृष्णाजी महाराजांच्या समाधी दर्शनासाठी गर्दी
चांदूररेल्वे : साडेतीनशे वर्षांपूर्वी अवधुती सांप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणारे कृष्णाजी महाराजांमुळे पावन झालेल्या सावंगा विठोबा नगरीत गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भक्तांचा जनसागर उसळला. लाखोंनी कृष्णाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. मनोकामना पूर्ण करण्याची भावना भाविकांनी व्यक्त केल्यात. दुपारच्या भर उन्हात समतेचे प्रतीक देव व भक्तांच्या ७० फूट उंच झेंड्यांना पदस्पर्श न करता नवीन खोळ चढविण्याचा चित्तथरारक क्षण भाविकांना पाहता आला.
कृष्णाजी अवधूत महाराजांच्या गुढीपाडवा यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. त्यामुळे सावंगा विठोबा मार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दूरच्या भाविकांनी आधीच सावंग्यात गर्दी केली. गुढी पाडव्याला कृष्णाजी महाराजांच्या दर्शनासाठी मिळेल त्या वाहनाने असंख्य भाविक वयोवृद्ध, बायका, लेकरांसह सावंग्यात दाखल झालेत.
पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढली होती. त्यामुळे मंदिरासमोर लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाची कृष्णाजी महाराजांच्या समाधी दर्शनासाठी धडपड सुरू होती. भर उन्हात आबालवृद्ध मिळेल या ठिकाणी हातावरच्या विटेवर कापूर जाळून कृष्णाजी महाराजाच्याप्रती श्रद्धा व्यक्त करीत होते.
अनेकजण नवसानुसार आप्त स्वकीयांच्या वजनाच्या भारोभार कापूर जाळताना दिसत होते. त्यामुळे कृष्णाजी महाराज मंदिर परिसर कापुराचा सुगंध व भाविकांच्या उपस्थितीने फुलला होता. मंदिराच्या सभामंडपात मनोरुग्ण सततच्या अवधुती भजनांचा आवाज घुमत होता. तर काही लोटांगण घालत मंदिराला प्रदर्शना घालत होते. ७० फूट उंच झेंड्यांना आबालवृद्ध रखरखत्या उन्हात दंडवत प्रणाम घालत होते.
बाहेरगावाहून व मृदंगाच्या साथीने अवधुती भजनामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

७० फूट उंच झेंड्याला नवीन चढविली खोळ
दुपारी ४ वाजता ७० फूट उंच देव व भक्तांच्या दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याला सुरुवात झाली. हभप चरणदास कांडलकर यांनी आंघोळ घालून नवीन कपडे चढविले. मंदिराचे विश्वस्त गोविंद राठोड, हरिदास सोनवाल, वामन रामटेके, दिनकर मानकर, विनायक पाटील, रुपसिंग राठोड, दत्तुजी रामटेके, अनिल बेलसरे, दिगांबर राठोड, बबनराव चौधरी, पुंजाराम नेमाडे, कृपासागर राऊतसह चरणदास कांडलकर यांनी श्री कृष्णाजी महाराजांच्या बोहलीचे दर्शन घेतले. झेंड्यांचे विधिवत पूजनानंतर कांडलकर यांनी दोन झेड्यांना पदस्पर्श न करता जुनी खोळ काढण्यास सुरुवात केली. दोरखंडाच्या साह्याने दोन उंच झेड्यांना बांधत जुनी खोळ काढत ते उंच टोकावर पोहोचले.

रामनवमीपर्यंत चालणार यात्रा
कृष्णाजी महाराज गुढीपाडवा महोत्सव ८ ते १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या काळात २ ते ५ हभप कारणकार महाराजांचे अवधुती भजन, प्रवचन व सायंकाळी ७ वाजता पालखी रमणा कार्यक्रम होणार आहे. १६ एप्रिल सकाळी ९ वाजता चैत्र व ढाल समाप्ती व गुढीपाडवा यात्रा महोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण अडसड व प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ ए. राजा यांच्या नेतृत्वात चांदूररेल्वेचे ठाणेदार गिरीश बोबडे, पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी, शेख रशीद, १२ पीएसआय, १५ महिला पोलीस, पोलीस मुख्यालय, आरसीपी प्लाटून, चांदूररेल्वे उपविभाग, एलसीबी व वाहतूक विभागाचे १३७ पोलीस कर्मचाऱ्यांनी कृष्णाजी महाराज मंदिराच्या आत व बाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

सावंगा ग्रामपंचायतीचे पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष
सावंगा विठोबा यात्रेत लाखो भाविक येतात. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात ग्रामपंचायत कुचकामी ठरली आहे. तसेच प्रसाधनगृहाची स्वच्छता व उपसा न केल्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे यात्रेकरुंनी ग्रामपंचायतीप्रती तीव्र रोष व्यक्त केला आहे.

Web Title: Laga bhakta ocean in Savgaa Vithoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.