ग्राहकांना अळ्या, अधिकाऱ्यांना काजू
By admin | Published: September 28, 2016 12:07 AM2016-09-28T00:07:52+5:302016-09-28T00:07:52+5:30
अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांच्या दिमतीला काजूची प्लेट नि पैसे मोजणाऱ्या ग्राहकांच्या कचोरीत अळ्या, अशी किळसवाणी व्यावसायिक रीत रघुवीरने अवलंबिली आहे.
...येपैसा बोलता है : 'रघुवीर'कडून एफडीएची खातिरदारी, निष्पक्ष कारवाई होणार कशी ?
अमरावती : अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांच्या दिमतीला काजूची प्लेट नि पैसे मोजणाऱ्या ग्राहकांच्या कचोरीत अळ्या, अशी किळसवाणी व्यावसायिक रीत रघुवीरने अवलंबिली आहे.
'लोकमत'ने कचोरीतील अळीचे धक्कादायक वास्तव लोकदरबारात मांडल्यानंतर अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी 'रघुवीर'मध्ये तपासणीसाठी धडकले. रघुवीरच्या संचालकांनी त्यांच्यासमोर काजूची प्लेट ठेवली. कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर काजूची प्लेट ठेवण्याची हिम्मत होतेच कशी? अधिकारी का सहन करतात ही लाचारी? लोकांच्या प्लेटमधील खाद्यान्नात अळी असताना, स्वत:समोर ठेवलेली काजूची प्लेट कशी चालली अधिकाऱ्यांना? एफडीएचे हेच काय कर्तव्य?
कचोरीत आढळलेली अळी ही रघुवीरच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असतानाही एफडीएकडून रघुवीरला पाठीशी घालण्याचाच प्रयत्न अधिक झाला आहे. ‘रघुवीर’वर एफडीएची मेहेरनजर का, या अमरावतीकरांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तर या छायाचित्रातून मिळत नाही ना?
ज्या ‘रघुवीर’वर डोळे मिटून विश्वास ठेवला जातो, त्याच्या खाद्यपदार्थ निर्मितीच्या ठिकाणी अस्वच्छता, हॅन्डग्लोव्हज न वापरणे, खाद्यान्न निर्मिणाऱ्या कामगारांची नियमित वैद्यकीय तपासणी न करणे अनेक गंभीर बाबी आढळून आल्यात. मुळात या मुद्यांचा अन्न व औषधी प्रशासनाने स्वत:हून शोध घ्यायला हवा होता. असल्या बाबी घडल्यावर त्यासाठी नोटीशी बजावण्याऐवजी नागरिकांच्या आरोग्याला धोकाच पोहोचू नये, याअनुषंगाने कर्तव्य बजावणे, हे एफडीएचे कर्तव्य आहे. परंतु स्टाफ नसल्याचे रडगाणे गाऊन हा विभाग बड्या धेंडांना नेहमीच पाठीशी घालत आला आहे.
रघुवीर प्रतिष्ठानचे तीन विक्री केंद्र आणि एक निर्मिती केंद्र आहे. सर्वच केंद्रांतील नमुने अधिकाऱ्यांनी घेतलेले नाहीत. खरे तर एकाचवेळी सर्वच ठिकाणचे नमुने घेणे कारवाईच्या दृष्टीने आवश्यक होते. परंतु अधिकाऱ्यांनी या बाबतीतही रघुवीरला छुपे बळ दिले.
पालकमंत्र्यांची बेदअदबी!
रघुवीरचा मुद्दा 'लोकमत'ने लोकदरबारात प्रभावीपणे मांडल्यानंतर पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी घेतलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत निरीक्षक दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी त्यांना रवाना करून प्रमुखांना- जयंत वाणे यांना बोलविण्यास सांगितले. 'लोकमत'ने हा किस्सा प्रकाशित केल्यावर असे काहीच घडले नसल्याचा बनाव वाणे यांनी सतत केला. पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून या बेअदबीबाबत त्यांना विचारणा झाल्यावर मात्र वाणे यांनी बैठकीला औषधी निरीक्षक उमेश घरोटे हे गेले होते हे मान्य केले. रघुवीरच्या बचावार्थ एफडीएची सारीच फळी कशी जुंपली आहे, याचे हे उदाहरण होय. (प्रतिनिधी)