महाराष्ट्र-मध्य प्रदेश वनविभागाच्या संयुक्त कारवाईत पकडले लाखोंचे सागवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 03:47 PM2022-11-21T15:47:55+5:302022-11-21T15:48:26+5:30

मध्य प्रदेशातील वनकर्मचारी गंभीर जखमी, परतवाड्यातील लाकूड तस्कराचे नाव चर्चेत

Lakhs of teak seized in joint operation of Maharashtra-Madhya Pradesh Forest Department | महाराष्ट्र-मध्य प्रदेश वनविभागाच्या संयुक्त कारवाईत पकडले लाखोंचे सागवान

महाराष्ट्र-मध्य प्रदेश वनविभागाच्या संयुक्त कारवाईत पकडले लाखोंचे सागवान

googlenewsNext

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील वनविभागाच्या संयुक्त कारवाईत लाखो रुपयांचे अवैध सागवान परतवाडा वनपरिक्षेत्रअंतर्गत वडुरालगत शनिवारी रात्री पकडले गेले. सागवान वाहून नेणाऱ्या वाहनाचा पाठलाग करीत असलेल्या मध्य प्रदेश वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर परतवाडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परतवाडा-धारणी मार्गाने बुरडघाटवरून धारखोराकडे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर गावालगत असलेल्या ससोदा येथून अवैध सागवान घेऊन (एमएच २७ एक्स ७२४२) क्रमांकाचे वाहन शनिवारी सायंकाळी परतवाड्याच्या दिशेने निघाले होते. ही माहिती मध्य प्रदेश व महाराष्ट्र वनविभागाला मिळताच सिपना वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांनी तत्काळ व्यूहरचना केली. परतवाडा-धारणी रोडवर संजीवनी धाब्यालगत व परतवाडा शहरातील म्युन्सिपल हायस्कूलपासून जाणाऱ्या वडुरा-बेलखेडा मार्गावर त्यांनी नाकाबंदी केली.

सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांनी स्वतः वडुऱ्याकडे कूच करीत गावालगत हे वाहन पकडले. यातील दोघे पळून गेले, तर चालकाला त्यांनी ताब्यात घेतले. यादरम्यान या वाहनामागोमाग येत असलेल्या तिघांनी (एमएच २७ सीएस ७४५२) क्रमांकाची दुचाकी सोडून पलायन केले. कारवाईनंतर एका कारमधून वन तस्कराशी संबंधित इसमाने घटनास्थळाचा फेरफटकाही मारल्याची माहिती आहे. यात परतवाडा आणि ब्राह्मणवाडा येथील वनतस्करांचे नाव पुढे आले आहे.

चालकासह पकडलेले वाहन परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालय व तेथून ते लाकडासह मध्य प्रदेशातील सावलमेंढा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास मध्य प्रदेश वनविभाग करीत आहेत. यात वनगुन्हा दाखल करण्यात आला.

सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्य भारती, दक्षिण बैतूल वनविभागाचे उपवनसंरक्षक विजयानंतम टी. आर., मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षक गिन्नी सिंह, अमरावती प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, मध्य प्रदेश वनविभागातील सहायक वनसंरक्षक आशिष बनसोड, परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, घटांग वनपरिक्षेत्र अधिकारी पवन बावनेर, वनपरिक्षेत्र अधिकारी मदन लोखंडे, सावलमेंढा वनपरिक्षेत्र अधिकारी परतेकी, वनपाल पी. एम. उमक, धनंजय पाण्डेय, वनरक्षक रोशन मकेश्वर, चंद्रकिरण पेंढरकर, एम. ओ. मातकर यांनी यशस्वी कामगिरी केली.

Web Title: Lakhs of teak seized in joint operation of Maharashtra-Madhya Pradesh Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.