लक्ष्मीने शिक्षणाची न्यूनता सारली दूर; १६ वर्षांचा संसार सांभाळत बारावीत मिळवले ६५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 04:12 PM2022-06-10T16:12:30+5:302022-06-10T16:29:10+5:30
HSC Result 2022 : लक्ष्मी यांनी पतीकडे लग्नानंतर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखविला. पतीनेही त्यांना साथ देत एमसीव्हीसी शाखेला प्रवेश मिळवून दिला.
दर्यापूर (अमरावती) : अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द बाळगत तालुक्यातील तोंगलाबाद येथील लक्ष्मी केशव बिजवाडे (३५) यांनी बारावी उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे, संसाराला दीड तप होत असताना त्यांनी शिक्षणाची न्यूनता दूर सारण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला आहे.
लक्ष्मी यांनी पतीकडे लग्नानंतर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखविला. लग्नानंतर आपण कोणती तरी नोकरी करावी, ही त्यांची इच्छा. पण, यासाठी शिक्षण कमी पडत होते. आपण आता पुन्हा शिकायला पाहिजे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता आणि यासाठी पतीची पण त्यांना मोलाची साथ हवी होती. त्यांचे पती केशव यांनी त्याला होकार देत दर्यापूरच्या प्रबोधन विद्यालयात एमसीव्हीसी शाखेला प्रवेश मिळवून दिला. त्यांनी जिद्दीने अभ्यास करून परीक्षेत ६५ टक्के गुण प्राप्त केले आहेत.
लक्ष्मी बिजवाडे या दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत गावात बचतगटाचे कार्य करतात. त्यांचा १५ वर्षांचा मुलगा असून तो नवव्या वर्गात शिकत आहे, तर पती केशव हे तोंगलाबाद येथेच किराणा दुकान चालवतात. त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.