शहरातील घाण, कचरा स्वच्छ करणाऱ्या ‘लक्ष्मी’
By admin | Published: November 11, 2015 12:15 AM2015-11-11T00:15:18+5:302015-11-11T00:15:18+5:30
‘हात फिरे तिथे लक्ष्मी वसे’ अशी एक म्हण आहे. शहरातील स्वच्छतेसाठी झटणाऱ्या ‘लक्ष्मी’रूपी सफाई कामगार महिलांनी शहर स्वच्छतेचा जणू वसाच घेतला आहे.
वसा स्वच्छतेचा : मोबदला मिळत असला तरी स्वच्छतेची सेवा दुय्यम नाही
अंजनगाव सुर्जी : ‘हात फिरे तिथे लक्ष्मी वसे’ अशी एक म्हण आहे. शहरातील स्वच्छतेसाठी झटणाऱ्या ‘लक्ष्मी’रूपी सफाई कामगार महिलांनी शहर स्वच्छतेचा जणू वसाच घेतला आहे. त्या राबतात म्हणूनच शहर नीटनेटके आणि स्वच्छ दिसते. घराघरातून निघालेल्या कचऱ्यासह मानवी घाण स्वच्छ करणाऱ्या आणि शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचा दर्जा लक्ष्मी एवढाच आहे. जिथे साफसफाई तिथे लक्ष्मी! या न्यायाने सफाई कामगार श्रेष्ठ ठरतात. कारण ते दुसऱ्यांनी केलेली घाण स्वत: स्वच्छ करतात. त्याचा त्यांना मोबदला मिळतो म्हणून त्यांची सेवा दुय्यम ठरत नाही. कारण, इतरांनी केलेला कचरा व घाण उचलण्याचा संकल्प इतका सोपा नसतो. अंजनगाव शहरात पूर्वीपासून सफाई कामगारांची वस्ती आहे. पूर्वीच्या काळी या कामगारांना मानवी विष्ठासुध्दा डोक्यावर वाहून न्यावी लागत असे. शहरातील पानअटाई भागातील महिला स्वच्छतागृहाच्या साफसफाईसाठी नेमलेल्या सुनीता बाबूलाल तांबे या ऐन सणासुदीच्या दिवसांतही त्यांचे काम तन्मयतेने करतात.
परिसराची झाडलोट करणे, घाण स्वच्छ करणे, पाणी शिंपडणे या कामात त्या सदैव व्यस्त असतात. किळस किंवा हयगय न करता सफाईचा वसा जपणाऱ्या या लक्ष्मींना खरे तर दिवाळीनिमित्त पुरस्कृत करायला हवे.
शासनाने दिला सफाई कामगारांना विशेष दर्जा
‘सेवेचे व्रत’ स्वीकारणाऱ्या सफाई कामगारांना शासनाने विशेष दर्जा दिला आहे. त्यांच्या कामाचे रोजचे मोजमाप ठरले आहे. या कामगारांना २० वर्षे काम केल्यावर कधीही स्वेच्छेने सेवानिवृत्त होता येते. त्यांच्या आकस्मिक मृत्यू अथवा सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वारसांना तीस दिवसांत नोकरीत सामाावून घ्यावे लागते. लाड कमेटीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना विविध सोयी-सवलती आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी मात्र सफाई कामगारांना संघर्ष करावा लागतो. अंजनगाव सुर्जी शहरात २३ महिला सफाई कामगार शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.