पर्यटनासोबतच लक्ष्मीची पावले
By admin | Published: January 3, 2016 12:37 AM2016-01-03T00:37:08+5:302016-01-03T00:37:08+5:30
वयाच्या पन्नाशीत कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या पर्यटन व्यवसायाला सुरुवात करून पर्यटन व्यवसायावर केसरीची नाममुद्रा कोरली आणि लक्ष्मीची पावले घरात शिरली, ....
केसरी पाटील : ‘शोध मराठी मनाचा’मध्ये उलगडला प्रवास
अमरावती : वयाच्या पन्नाशीत कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या पर्यटन व्यवसायाला सुरुवात करून पर्यटन व्यवसायावर केसरीची नाममुद्रा कोरली आणि लक्ष्मीची पावले घरात शिरली, अशा शब्दांत केसरी टुर्सचे संस्थापक आणि चेअरपर्सन केसरी पाटील यांनी जीवनपदर उलगडले.
भारतातील आणि परदेशातील रंजक प्रेरक, प्रेक्षणीय तसेच रमणीय स्थळांचे दर्शन घडविताना त्यांनी व्यवसाय काटेकोरपणा आपुलकीने जपला. शिस्तबद्ध, परिपूर्ण नियोजन आणि नावीन्यपूर्ण कल्पकतेचा संयोग घडवून पर्यटन उद्योगात ‘केसरी’ या नावाला वलय प्राप्त झाल्याचे केसरी पाटील यांनी सांगितले. पर्यटन उद्योगातून मिळविलेल्या समृद्धीचा वापर समाजहितासाठी व्हावे यासाठी त्यांनी केसरी आर्ट अॅन्ड कल्चर फाऊंडेशनची स्थापनाही केली आहे.
‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक मराठी अकादमीच्या संमेलनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवसी ‘लक्ष्मीचे पावले’ या सत्रात केसरी पाटील आणि उद्योजक मोहन गोरे यांनी विद्यार्थ्यांसमोर जीवनपट उलगडला.
८ जून १९८३ साली केसरी ट्रॅव्हल्स सुरू झाली. १०० चौरस फुटाच्या जागेत कार्यालय सुरू झाले व पुढे ‘गुडविल’च्या भरवशावर ‘एम्पायर’ उभे करण्यात आपण यशस्वी झालो.
कामात देवत्व शोधण्याचा गुण आपल्यात होताच असे सांगत गरिबीला आव्हान म्हणून स्वीकारा, भाऊबंदकी हा महाराष्ट्राचा पाचवीला पुजलेला शाप आहे, असे अधोरेखित करत मेहनतीला कुठलाही पर्याय नसतो, असा गुरुमंत्र त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
कामाआधी यश येत नाही
इंग्रजी डिक्शनरीमध्ये ‘वर्क’ आधी ‘सक्सेस’ येत असले तरी प्रत्यक्षात कामातही यश येत नाही, काम करून दाखवावेच लागते, अशा शब्दांत सुप्रसिद्ध उद्योजक मोहन गोरे यांनी यशाचा मार्ग अधोरेखित केला. १९४४ साली वडिलांच्या व्यवसायाला अवकळा आली. मात्र त्यानंतर पुढे कष्ट करून इंजिनियरिंग केले. उद्योजक म्हणून मिळविलेले यश काबाडकष्टातून मिळविले असल्याचे ते म्हणाले. गरीब नसाल तर श्रीमंत कसे व्हाल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारून उत्तरही देऊन टाकले.
गुडविल महत्त्वाचे - पुसदकर
‘लक्ष्मीचे पावले’ या सत्रात नितीन केळकर हे केसरी पाटील आणि मोहन गोरे यांची मुलाखत घेताना रामदास फुटाणे यांनी अमरावतीकर सोमेश्वर पुसदकर यांनाही बोलते केले. कुठल्याही व्यवसायात, समाजसेवेत, अन्य कुठल्याही क्षेत्रात ‘गुडविल’ महत्त्वाचे; लक्ष्मीची पावले इतरांच्या घरी गेलीत की ती आपल्या घरी आपोआप येतात, असे सांगत सोमेश्वर पुसदकर यांनी राजकारण आणि समाजकारणातील ‘कार्यकर्ता’ उलगडला.