अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत निघाली ८५ दिव्यांची धेंडाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:39 PM2019-10-29T12:39:43+5:302019-10-29T12:40:04+5:30
पश्चिम वऱ्हाडाची परंपरा असलेली धेंडाई दिवाळीच्या रात्री मोर्शी शहरातून काढण्यात आली. येथील धेंडाईला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पश्चिम वऱ्हाडाची परंपरा असलेली धेंडाई दिवाळीच्या रात्री मोर्शी शहरातून काढण्यात आली. येथील धेंडाईला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे. पंचक्रोशीतील शेकडो नागरिक यात सहभागी झाले.
दिवाळीच्या रात्री दिव्यांची आरास मांडून त्याची पूजा केली जाते. घरोघरी ही दिव्याची धेंडाई फिरवून अंधारावर, अज्ञानावर, गरिबीवर मात व्हावी, यासाठी प्रार्थना केली जाते. मोर्शीमध्ये धेंडाईची चार मंडळे आहेत. पहिली धेंडाई निघते, ती श्री समर्थ रामजीबाबा संस्थान माळीपुरा येथून. सर्वात जुनी धेंडाई म्हणून ती ओळखली जाते. दुसरी धेंडाई सुलतानपुरा येथील बजरंगबली संस्थानातून निघाली. तिसरी धेंडाई माळीपुऱ्याच्या दिव्यज्योती धेंडाई मंडळाची निघाली. चौथी धेंडाई माळीपुरा येथीलच महादेवराव गहुकार यांच्या घरून निघाली होती.
अशी असते धेंडाई
धेंडाई ही संपूर्ण लाकडापासून बनविलेली असते तसेच तिचा आकार हा एखाद्या पालखीप्रमाणे असतो. दोन माणसांना उचलता येईल अशी समोर व मागे काठ्याची व्यवस्था करण्यात आलेली असते. या धेंडाईमध्ये एकूण ८५ दिवे लावलेले असतात. लोक रात्रभर पारंपरिक चालीत धेंडाईची गाणे म्हणत असतात. धेंडाईच्या गाण्यामध्ये प्रामुख्याने गायीचा व कृष्णलीलेचा समावेश असतो. या गाण्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, ही गाणी कोठेही लिहिलेली नाहीत. धेंडाईची गाणे पूर्णत: मुखोद्गत असणारी मंडळी मोर्शीत आहेत.
माध्यमांकडून बेदखल
चारशे वर्षांचा इतिहास असलेली पारंपरिक धेंडाई केवळ मोर्शीत काढली जाते. मात्र, अजूनपर्यंत कोणत्याही माध्यमाने याची दखल घेतलेली नाही, अशी खंत गावकरी व्यक्त करतात. धेंडाईसोबत परिसरातील लोक ‘कुपची काठी कुपची जळ, गायी म्हशीन वाडेभर, गायी म्हशीनं भरले वाडे, विघ्न नामाने उडाले’ अशी पारंपरिक गाणे गातात. धेंडाईसोबत वामनराव रडके, वसंतराव मनगटे, मोहनराव घाटोळ, अरुण मडघे, दिलीप ढोरे, उमेश मनगटे, शेषराव मेंढे, राजू मगर्दे, नामदेवराव मगर्देे, किशोर बहाद्दूरकर, उमेश मिसळे, संदीप खेरडे, रविंद्र कुबडे, किशोर बनसोड, सुरेश दरवाई, प्रकाश कांडलकर, अरुण मनगटे, विजय गोहाड, माणिकराव कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.