नरबळीसाठी दिव्याचाही कौल !

By admin | Published: August 23, 2016 11:56 PM2016-08-23T23:56:32+5:302016-08-23T23:56:32+5:30

नरबळी देण्यासाठी मांत्रिकाकडून देवाचा कौल मिळविला जातो. मानवथ नरबळी प्रकरणात वापरण्यात आलेला कौल पाटाचा होता.

The lamp for the sacrifice! | नरबळीसाठी दिव्याचाही कौल !

नरबळीसाठी दिव्याचाही कौल !

Next

'तांद्री' सहजसाध्य : सुरेंद्रच्या भेटीला येणाऱ्यांमध्ये खटकणारे कोण ?
अमरावती : नरबळी देण्यासाठी मांत्रिकाकडून देवाचा कौल मिळविला जातो. मानवथ नरबळी प्रकरणात वापरण्यात आलेला कौल पाटाचा होता. विदर्भात सहसा दिव्याचा कौल प्रचलित आहे. प्रांतानुसार कौल मिळविण्याचे प्रकार बदलत असले तरी मानवथ नरबळीप्रकरणाशी पिंपळखुटा येथील नरबळी प्रकरणाचे बरेच साम्य आहे.
नरबळी हा प्रकारच मुळात मानसिकतेशी संबंधित असल्यामुळे शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करणाऱ्या कुण्या मांत्रिकाने आदेश दिल्याशिवाय बळी घेतला जात नाही. त्यासाठी मिळवावा लागणारा कौल मराठवाडा भागात जसा फिरणाऱ्या पाटावरून मिळविला जातो, वऱ्हाड-विदर्भ प्रांतात तसाच तो हलणाऱ्या दिव्याद्वारे मिळविला जातो.
करदोड्याची आडवी, उभी वीण करून एक जाळी तयार केली जाते. याला ग्रामीण भाषेत 'शिकं' असेही म्हणतात. या विणकामाची विशिष्ट पद्धती असते. सहसा या प्रकारासाठी काळा करदोडा वापरला जातो. साधारणत: तळहाताच्या तळव्याच्या आकाराच्या या जाळीला दोनेक हित लांब काही करदोडे सोडलेले असतात.
स्वस्तिक, हनुमान किंवा आणखी कुण्या देवाचे चित्र काढले जाते. ज्वारीच्या सहायाने हे देव रेखाटले जातात. ते शक्तीस्थळ म्हणून कार्य करतात. हळद-कुंकाने त्याची पूजा केली जाते. त्यावर करदोड्याची ती जाळी किंवा शिकं ठेवले जाते. त्यावर दिवनाली ठेवतात. जाळीच्या बाहेर आलेले लांब करदोडे मांत्रिक अंगठा आणि तर्जनीने अलगद उचलतो. हात जराही हलू न देता ती दिवनाली उचलली जाते. देवाला सवाल केले जातात. सांग देवा, काय हवे तुला? कुणाच बळी हवा? रक्त कुणाचे हवे? बराच वेळ प्रश्नांची ही सरबत्ती सुरूच असते. नरबळी या प्रकारावर अंधश्रद्धा ठेवणारे उपस्थित बघे मांत्रिकाचे हे कार्य डोळ्यात जीव आणून बघत असतात. जणू ते संमोहितच झालेले असतात. साऱ्यांचीच एकटक नजर मांत्रिकाच्या हातात अधांतरी असलेल्या दिवनालीवर असते. मांत्रिक त्यामुळे सजग असतो. तो सहसा दिवा हलू देत नाही. २०-२५ मिनिटे हे शिताफीने सुरू असते. उपस्थित अंधश्रद्धाळुंची आता उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. मांत्रिकाला तेच हवे असते. त्यामुळे विश्वासही दृढ झालेला असतो. आता मांत्रिक देवावर चिडतो. सांग देवा काय हवे तुला? कशाला त्रास देतो? सांग माणसाचे रगत देऊ काय? निरागस पोराचे रगत देऊ काय? इतक्यात कधीतरी बराचवेळापासून स्थिर असलेला हात किंचितसा हलतो. लांब करदोडाही हलतो. हात थोडा हलला तरी तो दिसत नाही. मात्र करदोडा लांब असल्यामुळे दिवनालीच्या हलण्याचे प्रमाण दिसण्याजोगे असते. दिवनाली डावीकडे गेली की तितकीच ती उजवीकडे जाते. त्यामुळे ती हलताना स्पष्टपणे दिसते. देवाने कौल दिल्याचे मानले जाते. भौतिक इप्सित साध्य करण्यासाठी सर्वजण कामी लागतात. दिवनाली हलली त्यावेळी जो प्रश्न विचारला असेल, त्या प्रश्नातच त्याचे उत्तरही दडलेले असते.
लंबकाचा नियम
दिवनाली हलते तोच मुळी हात किंचित हलल्यामुळे. करदोडा लांब असल्यामुळे त्याला लंबकाचा अर्थात् पेंडुलमचा नियम लागू होतो. लंबकाच्या गतीचा नियम हे सांगतो की, वस्तु जितकी उजवीकडे गेली असेल त्याच वेगाने व तितकेच अंतर ती डावीकडेही जाते. हे शास्त्रीयदृष्ट्या घडत असते. गुरुत्वाकर्षण शक्ती त्यासाठी कारणीभूत असते. तथापि अंश्रद्धाळू लोक त्यात दैवीशक्ती बघत असतात.
नरबळीच्या प्रयत्नांमध्ये दिव्याचा कौल बघितला गेला की कसे, या दृष्टीने पोलिसांनी तपास केल्यास महत्त्वाची समीकरणे सापडू शकतात. या प्रकाराला ग्रामीण भागत 'तांद्री पाहणे' किंवा ज्योत पाहणे असाही शब्द आहे.
सोपी पद्धती
घरातील मुलाच्या अंगावरून ज्वारी ओवाळून ती एखाद्या कोपऱ्यात ठेवली जाते. मुलाच्या अंगात ताप असेल तर तशा मुलाच्या अंगावरून ज्वारी ओवाळणे अधिक उपयोगी मानले जाते. घरातील कोपऱ्यातच हा कौल बघितला जात असल्यामुळे त्यासाठी विशेष उपलब्धी लागत नाहीत.

लक्षात राहणारा पेहराव
पिंपळखुटा येथील आश्रम परिसरात घडलेल्या नरबळीच्या घटनांमधील सुरेंद्र हा प्रमुख आणि कॉमन आरोपी आहे. सुरेंद्रने नरबळीचे प्रयत्न करण्यापूर्वी त्याने असा कौल बघितला काय? आश्रम परिसरात त्याच्या भेटीसाठी कुणी संशयास्पद लोक येत होते काय? वारंवार एकच व्यक्ती आली आहे काय? आश्रम परिसरात नियमित वास्तव्य असणाऱ्या लोकांना खटकणारी किंवा लक्षात राहणारी वेगळ्या पेहरावाची व्यक्ती सुरेंद्रला भेटल्याचे आठवते काय? या प्रश्नांची उत्तरे शोधली गेल्यास सुरेंद्रसोबत आणखी कोण सहभागी आहेत, याचा उलगडा होऊ शकेल. मूळ व्यक्तीपर्यंत पोहचता येवू शकेल. अन्यथा ती व्यक्ती मोकाट राहिल्यास ध्येय सिद्धीस जाईपर्यंत अनेक चिमुकल्यांच्या रक्तासाठी ती कौल मिळवून देत राहील.

Web Title: The lamp for the sacrifice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.