८४० ग्रामपंचायतींत झळकणार जमीन सुपीकता निर्देशांक फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:19+5:302020-12-12T04:30:19+5:30
अमरावती : जमिनीनुसार खतांचे नियोजन करून पिके घेतल्यास उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमीनीची माहिती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ८४० ...
अमरावती : जमिनीनुसार खतांचे नियोजन करून पिके घेतल्यास उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमीनीची माहिती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये जमीन सुपीकता निर्देशांकाचे फलक लावले जाणार आहेत. जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून कृषिमंत्र्यांनी हा आदेश दिला आहे.
शेतकरी मोठ्या कष्टाने आणि आर्थिक भांडवल जमवत पिके घेतात. त्यातून त्याला अपेक्षित उत्पन्न व मिळाल्यास नुकसान होते. याकरिता जमिनीची सुपीकता लक्षात घेऊन पिके घेणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना सोप्या भाषेत कळेल, असे गावातील जमिनीतील अन्नघटक आणि त्यासाठी आवश्यक खते किती प्रमाणात घ्यावीत, याची माहिती देणारे सुपीकता निर्देशांक फलक प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत तसेच गावातील प्रमुख पिकांच्या मार्गदर्शनासाठीही तेथे फलक लावावेत, असे आदेश कृषिमंत्री यांनी दिले आहे. राज्यात मागील काही काळापासून जमिनीची सुपीकता कळावी, याकरिता मृदा परीक्षणाकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ३८ हजार ५०० गावांचे जमीन सुपीकता निर्देशांक तयार केले आहेत. ते कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ठेवले आहेत. सुपीकता निर्देशांक तयार करताना त्या गावातील प्रमुख पाच पिकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. यात खरिपातील तीन व रबी हंगामातील दोन पिकांची निवड केली आहे. भौतिक रासायनिक व जैविक गुणर्धमाचा विचार करून विविध गावांचे वेगवेगळ्या १२ प्रकारे सुपीकता निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
कोट
गावातील जमीन सुपीकता निर्देशांक फलक लावल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीत उपलब्ध घटकांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक खतेच पिकांना देता येतील. परिणामी खतावर होणारा अनावश्यक खर्च वाचणार आहे.
- विजय चव्हाळे,
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी