धक्कादायक! २९३ सातबारावरील भूदानधारकांची नोंद गायब; भूदान यज्ञ मंडळाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 01:44 PM2022-05-16T13:44:11+5:302022-05-16T13:51:35+5:30
भूदान यज्ञ मंडळद्वारे दहा वर्षांपासून अधिनियम भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अंकेक्षण केले असता, भूदानच्या अधिकार अभिलेखात महसूल विभागाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे.
गजानन मोहोड
अमरावती : आचार्य विनोबा भावे यांना भूदान चळवळीदरम्यान दान मिळालेल्या व भूमिहीन मजुरांना पट्टेवाटप केलेल्या जमिनीच्या तब्बल २९३ सात-बारावरील भूदानधारकांची नोंदच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. याशिवाय २७० सात-बारावर ‘भूदान अहस्तांतरणीय’ अशी नोंद गायब झालेली झालेली आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमुळे या नोंदी गायब झाल्याचा आरोप भूदान यज्ञ मंडळाने केला आहे.
भूदान जमीनसंदर्भात अधिकार अभिलेख्यातील भूदान यज्ञ अधिनियम १९५३ नुसार नसल्याचे वास्तव आहे. भूदानवाटपाच्या अटी-शर्तीमध्ये जमीन पडीत ठेवली जाणार नाही व ती हस्तांतरित केली जाणार नाही, या दोन प्रमुख अटी आहेत. अटींचा भंग झाल्याची माहिती सर्वप्रथम तलाठ्यांना होत असताना शर्तभंगाची सूचना तहसीलदार व भूदान यज्ञ मंडळांना देणे त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. मात्र, कर्तव्यात कसूर होत आसल्याने जमिनीचे हस्तांतरण होत आहे. अशी शर्तभंगाची ३५ प्रकरणे उघडकीस आल्याची माहिती मंडळाचे सचिव नरेंद्र बैस यांनी ‘लोकमत’ला दिली.
मंडळाद्वारा जिल्हाधिकारी यांच्याशी भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत एक निश्चित कालमर्यादेत अधिकार अभिलेख्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, आदेशच जारी न केल्याने प्रकारात वाढ होत असल्याचे दिसून येते. भूदान यज्ञ मंडळद्वारे दहा वर्षांपासून अधिनियम भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अंकेक्षण केले असता, भूदानच्या अधिकार अभिलेखात महसूल विभागाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे.
५५ सात-बारावर भोगवटदार वर्ग २ ऐवजी १
‘भूदान अहस्तांतरणीय’च्या ५५ सात-बारावरील भोगवटदार वर्ग २ गायब होऊन तेथे वर्ग १ अशी नोंद झालेली आहेत. यामध्ये वरूड तालुक्यात १३, चांदूर बाजार तालुक्यात १२, मोर्शी, अचलपूर, भातकुली व धारणी तालुक्यात प्रत्येकी दोन, अमरावती व दर्यापूर तालुक्यात प्रत्येकी तीन तसेच अंजनगाव व चांदूर रेल्वे तालुक्यात प्रत्येकी पाच प्रकरणे उघडकीस आलेली आहे.
मंडळाद्वारा पट्टेवाटप
मंडळाद्वारा पट्टेवाटप केलेल्या २९३ सात-बारावरील भूदानधारकांच्या नोंदीच गायब करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मोर्शी तालुक्यात ६३, अचलपूर ५०, अमरावती ३७, वरूड ३६, चांदूर बाजार ३१, दर्यापूर २४, चांदूर रेल्वे १५, नांदगाव खंडेश्वर १२, भातकुली ११, अंजनगाव ८, धामणगाव ५, तिवसा ४ व धारणी तालुक्यात २ प्रकरणे आहेत.
३४ प्रकरणात शर्तभंग
भूदान जमिनीच्या ३४ प्रकरणात शर्तभंग झालेला आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यात सर्वाधिक २१ प्रकरणे आहेत. अधिकार बाह्य ३७ फेरफार नोंदविण्यात आलेले आहेत. याशिवाय अवांच्छित नोंद असलेली २४० प्रकरणे आहेत. त्यामुळे ही सर्व प्रकरणे जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५८, पोटकलम २ अन्वये पुनर्विलोकित होणे महत्त्वाचे आहे.
भूदान जमिनीचे शर्तभंग, सात-बाऱ्यावरील नोंद गायब, भोगवटदार वर्ग बदल, अधिकारबाह्य फेरफार आदी प्रकरणे भूदान अधिनियम १९५३च्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांच्याद्वारा अधिकार अभिलेखात दुरुस्तीसाठी दिशानिर्देश देण्याची गरज आहे.
- नरेंद्र बैस, सदस्य, संयुक्त सचिव (भूदान अंकेशन), भूदान यज्ञ मंडळ