मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाला तीन मशीन देणार
By Admin | Published: April 17, 2017 12:14 AM2017-04-17T00:14:32+5:302017-04-17T00:14:32+5:30
झ्रजिल्ह्यात सध्या भूमापनासाठी तीन मशीन उपलब्ध आहेत. मोजणी प्रकरणांची संख्या अधिक आहे.
पालकमंत्री : तालुकास्तरावर शिबिर आयोजित करावे
अमरावती : झ्रजिल्ह्यात सध्या भूमापनासाठी तीन मशीन उपलब्ध आहेत. मोजणी प्रकरणांची संख्या अधिक आहे. यामुळे जमीन मोजणी लवकर होण्यासाठी जिल्हा नियोजन समीतीतून तीन मशीन भूमिअधीक्षक कार्यालयाला देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.
महाराजस्व अभियानाच्या धर्तीवर तालुकास्तरावर शिबीरांचे आयोजन १८ ते २० मे दरम्यान करण्याबाबत ही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी, लाचलुचपत प्रतिबंधकचे अधीक्षक महेश चिमटे, भूमिअभिलेख उपअधीक्षक मंगेश पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील भूमी अभिलेख कार्यालयाशी प्रलंबित संबंधित प्रकरणांची संख्या वाढत आहे. या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी उपलब्ध तीन मशीनवर कार्यभार वाढलेला होता असे चर्चेअंती लक्षात येताच बैठकीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जिल्ह्यात मार्च अखेर ६५६९ प्रकरण दाखल झाली होती. पैकी ४८७६ प्रकरण निकाली निघाली असून १६९२ भूमीअभिलेख प्रकरणे प्रलंबित असल्याने पालकमंत्र्यांनी प्रकरणांचा सखोल आढावा घेतला. प्रलंबित प्रकरणांची स्थिती काय व कोणत्या कारणाने प्रलंबित राहिले, यासंबंधी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जानेवारीपर्यंत शहरात भूमापनाची १८३ प्रकरणे दाखल झालीत. महापालिका क्षेत्रातील १२ नवीन गावांचा समावेश झाल्याने अतिरिक्त कामासाठी नवीन मशीनची आवश्यकता आहे. यामुळे भूमापनाचे काम गतीने होईल. जिल्ह्यातील ८० हजार मिळकतीमधील ४ ते५ हजार मिळकतीच्या रेकॉर्डमध्ये दुरूस्ती असल्याची माहिती यावेळी उपअधीक्षक भूमीअभिलेख मगेंश पाटील यांनी दिली. यावेळी समाजकल्याणचे उपायुक्त दीपक वडकुते, डेप्युटी सीईओ माया वानखडे यांच्याशी पालकमंत्र्यानी चर्चा केली.