गणोरीच्या पेढी प्रकल्पग्रस्तांचे राणांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:09 AM2017-07-25T00:09:22+5:302017-07-25T00:09:22+5:30
निम्नपेढी प्रकल्पासाठी सन २०११ मध्ये अत्यल्प दरात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचे गणोरी येथील शेतकऱ्यांनासुद्धा एकरी ११ लाख ८० हजार रूपये प्रतीएकर मोबदला देण्यात यावा, ...
मोबदल्यातील तफावत दूर करा : आमदारांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निम्नपेढी प्रकल्पासाठी सन २०११ मध्ये अत्यल्प दरात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचे गणोरी येथील शेतकऱ्यांनासुद्धा एकरी ११ लाख ८० हजार रूपये प्रतीएकर मोबदला देण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी आ. रवि राणा यांना दिले. राणांनी या निवेदनाची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात बैठक बोलविण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे.
निम्नपेढी प्रकल्पासाठी गणोरी येथील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी सन २०११ मध्ये अत्यल्प म्हणजे १ लाख १० हजार एकराप्रमाणे मोबदला देऊन अधिग्रहित करण्यात आल्यात. परंतु अलीकडच्या काळात या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमीनधारकांना ११ लाख ८० हजार रूपये एकराप्रमाणे मोबदला दिला जात आहे. हा आपल्यावर अन्याय असल्याचा आरोप गणोरीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी केला असून ही मोठी तफावत भरून काढावी व सध्याच्याच दराने आर्थिक मोबदला मिळावा, अशी मागणी आ. राणांना सादर निवेदनातून केली आहे. आ.राणा लवकरच यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून गणोरीतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
निवेदन देताना सोपान टेकाडे, संदीप देशमुख, नामदेव टेकाडे, विनायक ठोंबरे, विनायक जंगले, अनिल देशमुख, रेहानाबी मस्तान खाँ, मनोज जंगले, दिनकर जोंजाळे, आशिष कावरे, सैफुल्ला खाँ पठाण, दिलीप देशमुख आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.