भूमिहीन शेतकरी पुत्रांना मिळेनात वधू!
By admin | Published: May 6, 2016 12:15 AM2016-05-06T00:15:36+5:302016-05-06T00:15:36+5:30
शुभमंगल सावधान या शब्दाची वेळ प्रत्येक समाजातील तरुणांच्या जीवनात येते. मात्र तालुक्यातील २ ते ३ वर्षांपासून भूमिहीम शेतकरी युवकांची गोची झाल्याचे दिसून येते.
कर्मचाऱ्यांना प्राधान्य : शेती व्यवसाय बेभरवशाचा परिणाम
सुनील देशपांडे अचलपूर
शुभमंगल सावधान या शब्दाची वेळ प्रत्येक समाजातील तरुणांच्या जीवनात येते. मात्र तालुक्यातील २ ते ३ वर्षांपासून भूमिहीम शेतकरी युवकांची गोची झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण कमी असल्याने व स्थावर मालमत्ता नसल्याने बहुतांश समाजातील युवक मुली बघण्याकरिता फिरताना दिसतात. परंतु मुलींची बहुतांश समाजामध्ये कमतरता असल्याने भूमिहीम मुलांना प्रत्येक समाजात मुली देण्यासाठी नकार मिळत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
आपल्या मुलीला चांगला पती मिळण्याकरिता शेती, स्थावर मालमत्ता किंवा कंपनीमध्ये काम करीत असेल तरच मुलीला दाखवितात. नाही तर मुली दाखविण्यासच तयार होत नसल्याचे शेतकरी मजूर तरुणांच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. काही छोट्या समाजामध्ये मुलीचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे व पैशाने लबालब असल्याने त्यांना कोणत्याही समाजाची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारणे वावगे वाटत नाही. काही सुशिक्षित समाजातील तरुण तर बहुतांश वृत्तपत्रांत मुलगी पाहिजे म्हणून जाहिरात देतात व त्या जाहिरातीत मी स्वत: ३० हजार रुपये महिना कमावत असून मी कोणत्याही समाजाची मुलगी करायला तयार आहे करिता संपर्क साधावा, अशा प्रकारच्या जाहिराती देऊन मुली शोधत असल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीमुळे तालुक्यातील तरुणांची मानसिकता खराब होत चालली आहे. त्या मानसिकतेमध्ये बहुतांश तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहेत. यापेक्षाही उलट म्हणजे मुलीचे आई-वडील दारू पिणाऱ्या शासकीय नोकरी करणाऱ्या मुलांना डोळे बंद करून मुली देण्यास तयार होतात. मात्र राबराब कष्ट राबणाऱ्या तरुणांकडून शेतीचे कामे करून घेतात. मात्र मुलगी देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र नकार देतात. यामुळे तालुक्यातील भूमिहीन मजूर वर्गातील मुलांचे आई-वडील हतबल झाले असून मुलासाठी मुलगी शोधावी तरी कशी, असा पेच त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने भूमिहीन शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य देऊन काही प्रमाणात भूमिहीन तरुणांपुढील संकट दूर करावे. तसेच शासकीय बँकांमार्फत भूमिहीन शेतकऱ्यांना सुलभ स्वरुपात कोणतीही अट न ठेवता उद्योगधंद्यासाठी कर्ज देण्यात यावे, अशा प्रकारची इच्छा तालुक्यातील भूमिहीन तरुणांनी बोलून दाखवली.
दारू पिणारा चालेल, पण सातबारा असावा
तालुक्यामध्ये भूमिहीन तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी काही तरुणांनी स्वकष्टाच्या जोरावर प्रगतीसुद्धा केली आहे. तरीसुद्धा प्रत्येक समाजामध्ये भूमिहीन तरुणांना मुली देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. दारू पिणारा मुलगा असला तरी चालेल. पण त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता किंवा शासकीय-निमशासकीय नोकरी असायला हवी. अशांनाच प्रत्येक समाजामध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते, असे परतवाडा येथील पुरुषोत्तम काळे यांनी सांगितले.
कोणत्याही समाजाचा असो त्या प्रत्येक समाजाच्या मुलींच्या आई-वडिलांना आपल्या मुलीला योग्य वर मिळावा, अशी अपेक्षा असते. त्याकरिता ते प्रथम प्राधान्य शासकीय-निमशासकीय नोकरी करणाऱ्या तरुणांना देतात. त्यामुळे अशी अपेक्षा ठेवणे साहजिकच आहे. परंतु प्रत्येक समाजामध्ये असेही काही आई-वडील आहेत की भूमिहीन कष्टकरी मुलांनासुद्धा प्राधान्य देतात.
- शुभम गायकवाड, धामणगाव गढी
समाजामध्ये असलेले मुलींचे कमी प्रमाण यासाठी सर्वाधिक कारणीभूत आहे. प्रत्येक आई-वडीलाची इच्छा असतेकी, आपल्या मुलीचे जीवन सुखात जावे याकरिता ते आर्थिक स्थितीने सुदृढ असणाऱ्या मुलांनाच प्राधान्य देतात. त्यामुळे भूमिहीन तरुणांना मुली मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकावे लागते. परंतु या सर्व कारणामुळे तरुण मुलांची मानसिकता बिघडत चालली आहे.
- विवेक काळे, धामनगाव गढी