कुठे भूस्खलन तर कुठे दरड कोसळण्याचा धोका, प्रशासन अलर्ट मोडवर
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 22, 2023 04:03 PM2023-07-22T16:03:53+5:302023-07-22T16:05:24+5:30
अनेकदा घडल्या घटना : धोकादायक गावांची मागितली यादी
अमरावती : इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर भूस्खलनाचा धोका असलेली गावे पुन्हा रडारवर आलेली आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारचा धोका नसला तरी भूस्खलन झाल्याचे काही प्रकार दर्यापूर व मेळघाटात झाले असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अशा धोकादायक गावांची यादी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला मागितली आहे.
पावसाळ्याचे दिवसात जोराचा पाऊस, वादळ व अतिवृष्टी झाल्यास मेळघाटात दरड कोसळण्याचे व नदी व नाल्यांना पूर आल्यांनंतर काठ खचल्याचे प्रकार अनेकदा होतात. यामध्ये जिवित हानी होण्याचा धोका नाकारता येत नाही, त्यामुळे अशा ठिकाणी काय पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते किंवा आवश्यक त्या दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रशासनाद्वारे आढावा घेल्या जात आहे.
जमिनीच्या ऱ्हासामुळे वनस्पतीद्वारे जमिनी स्थिरीकरण वारंवार होते. याशिवाय हवामान व पर्यावरणातील, याशिवाय नैसर्गिक घटनांनीदेखील भूस्खलन होण्याचा धोका असतो. डोंगरकड्याची माती घसरणे, दरड कोसळणे भेगा पडणे, पाण्यासोबत मलबा वाहून येणे, याबाबीचे निरीक्षण असणे महत्वाचे आहे.