संत्रा झाडांच्या पानांवर अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:22 AM2019-08-19T01:22:42+5:302019-08-19T01:23:35+5:30
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाºया वरूड तालुक्यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आता या वैभवाला आणि संत्राउत्पादकांच्या समृद्धीला ओहोटी लागली आहे. प्रथम आंबिया फळाची गळ आणि आता पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे संत्रा झाडांची रया गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाºया वरूड तालुक्यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आता या वैभवाला आणि संत्राउत्पादकांच्या समृद्धीला ओहोटी लागली आहे. प्रथम आंबिया फळाची गळ आणि आता पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे संत्रा झाडांची रया गेली आहे. यावर उपाय सूचविण्याची विनवणी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाला होत आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात लाखो रुपये खर्च करून संत्रा झाडे व संत्रा फळे वाचविण्यासाठी शेंदूरजनाघाट परिसरातील संत्राउत्पादकांना प्रयत्न करावे लागले. ज्याच्याकडे पाणी होते, त्यांच्या संत्राझाडे व संत्राबागावरील फळे वाचली. मात्र, मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी व अतिशय तापमानाने इतर शेतकºयांची संत्राफळे उन्हाळ्यातच गळली. खरिपाच्या पावसानेही दगा दिला. जूनच्या अखेरपर्यंत ४० अंश सेल्सिअस तापमान होते. भर पावसाच्या कालावधीत तापमान वाढत गेल्याने संत्राझाडे अक्षरश: वठली. पावसाने सुरुवात केली ती संथगतीने. त्यामुळे जमिनीत पाहिजे तसा ओलावा नसल्याने व जमिनीने बाष्प पकडल्याने झाडांची स्थिती दयनीय होती. पुढे पाऊस वाढला; मात्र दमदार नसल्याने जमिनीला पुरेसा ठरला नाही. परिणामी संत्राफळाला गळती लागली. त्यातच फळावरील फडक्या (फळ लटकणे) सुरू झाला. त्यानंतर देठातून संत्रे पिवळी होऊन मोठ्या प्रमाणात गळ सुरू झाली. फळगळीचे प्रमाण मोठे असून, महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही ही गळ आटोक्यात येत नसल्याने संत्रा उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे.
आता शेंदूरजनाघाट परिसरातील काही भागात पाने खाणाऱ्या अळीने संत्रा झाडांवर हल्ला चढविला आहे. मौजा खेडी परिसरात संत्रा झाडांवर व जमिनीवर प्रचंड प्रमाणात अळ्या दिसून येत आहेत. यामुळे झाडावरील पाने त्या अळ्या खात असून, या पाने खाणाऱ्या अळ्यांचे संत्रा झाडांवर शेंदूरजनाघाट परिसरातील काही भागात जास्त, तर काही भागात कमी असे असले तरी सर्वत्रच फवारणी करून आटोक्यात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
जमिनीची उष्णता पूर्ण निघाली नाही. त्यातच सर्वदूर मुसळधार पाऊस असताना तालुक्यातील बराच भाग पावसापासून वंचित राहिला. केवळ हलक्या व बरड जमिनीतून पाणी जेमतेम राहिले, तर मध्यम व भारी जमिनीतील अजूनही पावसाची कमतरता असल्याने संत्राउत्पादक चिंतातुर झाला आहे. खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्यासोबतच संत्रा झाडांवरील पाने खाणाऱ्या अळ्या वाढतच असल्याने यावर उपाययोजना सुचवण्याकरिता कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. संत्रा उत्पादन घेण्याºया शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, रवाळा, सातनूर, पुसला, मालखेड, वाई, वरूड, धनोडी, मालखेड, जरूड, तिवसाघाट, पुसली, टेंभुरखेडा, हातुर्णा, गव्हाणकुंड परिसरात अंबीया बहाराची गळ सुरू असल्याने नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटले आहे.
संत्रा झाडावर पाने खाणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढवला. कृषी विभागाने संत्राउत्पादकांना १०० टक्के अनुदानावर फवारणी औषध द्यावे. याकरिता कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी तसे आदेश द्यावेत.
- हर्षल फुटाणे
संत्रा उत्पादक, शेंदूरजनाघाट
संत्रा झाडांवरील फळाची गळ दिवसागणिक वाढतच असुन अळ्यांनीही हल्ला चढवला. कृषी विभागाने त्वरित दखल घेऊ न अनुदानावर फवारणी औषध उत्पादकांना त्वरित उपलब्ध करून द्यावे.
- सतीश अकर्ते
संत्राउत्पादक, शेंदूरजनाघाट