प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या ‘त्या’ महाविद्यालयाचा अखेर माफीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 09:14 PM2020-02-15T21:14:26+5:302020-02-15T21:15:15+5:30
शपथेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला असेल, तर आम्ही या देशातील अशा सर्व लोकांची नम्रपणे माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो
अमरावती - मुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या चांदूर रेल्वे (जि. अमरावती) येथील महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या निर्णयावर दोन दिवस टीकेची झोड उठल्यानंतर अखेर महाविद्यालयाने माफीनामा जारी केला. प्राचार्य राजेंद्र हावरे यांची स्वाक्षरी माफीनाम्यावर आहे. शपथ देण्याची संकल्पना महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रदीप दंदे यांची होती.
‘शपथेमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या. काहींच्या समोर व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला. शपथेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला, असा प्रत्यय त्यातून आला असेल वा येत असेल, तर आम्ही या देशातील अशा सर्व लोकांची नम्रपणे माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.’ अशा शब्दांत महाविद्यालयाने माफी मागितली आहे.
माफीनाम्यातच शपथ का दिली, याबाबतही ऊहापोह करण्यात आला आहे. अल्लड वयातील मुलींना प्रेमाची समज नसते. आपमतलबी तरुणांकडून त्यांची फसगत होते. पालक मुलींच्या भविष्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. वैचारिक अपरिपक्वतेतून चुकीचा निर्णय घेण्याऐवजी पालकांवर विश्वास ठेवणे हे नेहमीच हितकारक असते. समज पक्व झाल्यावर कुठलाही निर्णय घेतल्यास कुणाची हरकत नसते, या जाणिवेने मुलींना शपथ देण्यात आली, असे स्पष्टीकरण पत्रातून देण्यात आले आहे.