मागील तीन वर्षांतील कामांची तपासणी करणार
By admin | Published: January 18, 2015 10:28 PM2015-01-18T22:28:56+5:302015-01-18T22:28:56+5:30
जिल्ह्याच्या विकासासाठी सन् २०१५-१६ या वर्षाचा सुमारे ३७२.२७ कोटी रूपयांचा विकास आराखडा रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे
पालकमंत्र्यांची माहिती : ३७२.२७ कोटीचा आराखडा मंजूर
अमरावती : जिल्ह्याच्या विकासासाठी सन् २०१५-१६ या वर्षाचा सुमारे ३७२.२७ कोटी रूपयांचा विकास आराखडा रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांत जिल्हा नियोजन समितीमधून जी कामे करण्यात आली त्यासर्व कामांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पत्रपरिषदेत दिली.
जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाचे व्हिजन डोळयासमोर ठेवून मागील १५ दिवसापासून प्रशासनातील अधिकारी व स्वत: पालकमंत्री यांनी लक्ष देऊन जिल्ह्याचे नियोजन सर्वांना समान न्यायाची भूमिका ठेवून तयार केल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले . जिल्ह्याचे नियोजन करताना सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजना,आदिवासी उपाययोजना, आदिवासी उपाययोजनांसाठी नियोजनात तजवीज करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी, पाटबंधारे, रस्ते, पूरनियंत्रण, सामाजिक सेवा, ऊर्जा, विकासाची कामे यासह विविध बाबींचा समावेश आहे. लघु उद्योगासाठी ही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे . मागील वर्षी सुमारे १७५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता त्यापैकी आतापर्यत सुमारे ७५ कोटी रूपये विविध कामांवर खर्च झाले आहेत तर १०० कोटी रूपयांतून कामे सुरू असल्याचे पालकमंत्री पोटे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन आराखड्यातून जी कामे झाली त्या कामांची तपासणी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली असून नवीन आराखडयातील सर्व कामे चांगल्या गुणवत्तेची करावी याची खबरदारी घेतली जाणार आहे. पत्रपरिषदेला विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, रवींद्र धुरजड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)