दोन महिन्यांत अपघातात तीन चितळ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:31 PM2018-02-10T22:31:12+5:302018-02-10T22:33:33+5:30
चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत चिरोडी वर्तुळातील पोहरा-चिरोडी मार्गावर शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षांचे मादी चितळ ठार झाले.
आॅनलाईन लोकमत
पोहरा बंदी : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत चिरोडी वर्तुळातील पोहरा-चिरोडी मार्गावर शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षांचे मादी चितळ ठार झाले. गत दोन महिन्यांत आतापर्यंत तीन चितळ ठार झाल्याने वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका वाढला आहे.
चांदूररेल्वे-अमरावती मार्गावर वनक्षेत्रातून रस्ता ओलांडताना या मार्गावर वनखंड ४१ क्रमांकाच्या वनक्षेत्र परिसरात दोन महिन्यांत एक नर, दोन मादी असे तीन चितळ आतापर्यंत ठार झाले आहेत. या वनक्षेत्रातून पाण्यासाठी भटकणाऱ्या चितळांच्या अपघाती मृत्यूच्या घटनांमुळे वनविभाग सजग झाला आहे. ही घटना घडताच चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी घटनास्थळ गाठले. चिरोडीचे वनपाल एम.के. निर्मळ, वनरक्षक राजन हिवराळे यांनी पंचनामा करून चितळाचे शवविच्छेदन केले. वनक्षेत्रात मृत चितळाचा दफनविधी करण्यात आला असून, पशुवैद्यकीय अधिकारी घाटोळे यांनी शवविच्छेदन केले.
चांदूर रेल्वे ते अमरावती मार्गावर एका महिन्यात तीन चितळांना अपघातात प्राण गमवावे लागले. देवनदी ते चिरोडी या एक किमीच्या अंतरावर वनविभागाने गतिरोधक प्रस्तावित केले आहे. चिरोडी या राखीव जंगलात वन्यपशूंची संख्या वाढीस लागली आहे. वन्यपशूंचा रस्ते अपघातापासून बचाव व्हावा, यासाठी वन्यक्षेत्रातील अमरावती-चांदूररेल्वे राज्य मार्गावर गतिरोधक निर्माण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वनविभागाने सादर केलेला आहे. नवीन सावंगा फाटा, देवनदी, गोडने महाराज आश्रम, विठोबा सावंगा फाटानजीक रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याची मागणी चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी केली आहे.
राखीव जंगलात एका क्षेत्रातून दुसºया क्षेत्रात मुक्त विहार करताना वन्यपशूंना राज्य मार्ग ओलांडावा लागतो. हा मार्ग ओलांडताना वन्यपशूंचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राखीव जंगलात वन्यपशूंच्या मार्गावर गतिरोधक निर्माण करण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र देऊन तसे कळविले आहे.
चांदूररेल्वे राज्य मार्गावरच राखीव जंगल आहे. वन्यक्षेत्रातून जाणाºया रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे कळविले आहे.
- आशिष कोकाटे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूररेल्वे