पाच केंद्रांत कोरोना लसीकरणास शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:12 AM2021-01-17T04:12:33+5:302021-01-17T04:12:33+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला शनिवारी प्रारंभ झाला. जिल्हा रुग्णालयात जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, पीडीएमसी केंद्रात ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला शनिवारी प्रारंभ झाला. जिल्हा रुग्णालयात जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, पीडीएमसी केंद्रात अधिष्ठाता अनिल देशमुख यांना पहिल्या लसीकरणाचा मान मिळाला. याच केंद्रावर माजी मंत्री सुनील देशमुख व डॉ. सोनाली देशमुख या दाम्पत्याने लस टोचून घेतली. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ५०० हेल्थ केअर वर्कर्सना लस देण्यात आली. याच लाभार्थ्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोज दिला जाणार आहे.
अमरावती येथे जिल्हा रुग्णालय व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या पाच केंद्रांवर लसीकरणाचा शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्कर्सचे लसीकरण होणार आहे. याकरिता कोविशिल्ड लसींचा सुमारे १६ हजार ७०० व कोव्हॅक्सिन प्राप्त झाल्या आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण मोहिमेचे उत्साहात स्वागत केले. लसीकरण व निरामय आरोग्याच्या संदेश देणाऱ्या रांगोळ्या केंद्रांवर रेखाटण्यात आल्या. केंद्रात प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष, अशी रचना केलेली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदिंनी केंद्राला भेट देऊन हेल्थ वर्कर्सचे मनोबल वाढविले.
अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही यशस्वीपणे लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली. या केंद्रात डीएचओसह अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लस घेतली. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतही लसीकरणाबाबत स्वागत व आनंद व्यक्त होत आहे.
बॉक्स
इर्विनमध्ये कोव्हक्सिन, चार केंद्रात कोविशिल्ड
राज्यात सहा ठिकाणी कोव्हॅक्सिन लसही देण्याचा निर्णय झाला. त्यात पुण्यासह अमरावती जिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. त्यानुसार कोव्हॅक्सिन लसीचे दोन हजार डोज जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले व तेथील केंद्रात ही लस देण्यात येत आहे. अन्य केंद्रांवर मात्र, कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. कंपनीचा फरक असला तरी दोन्ही लस सारख्याच असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
महापालिकेद्वारे चार संदेश
आपणास कोरोनाची लस देण्यात आली आहे. यानंतरही मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सहा फुटांचे शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. लसीकरणानंतर आपणास काही त्रास जाणवल्यास आपण ए.एन.एम./आशा, जवळच्या आरोग्य केंद्र किंवा कोरोना कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. पुढील डोजची तारीख, वेळ व ठिकाण आपल्या मोबाईलवर एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल.
बॉक्स
०.५ मिलीचा एक डोज
प्रत्येक व्यक्तीला ०.५ मिलीचा डोज देण्यात आला. यानंतर कोणत्याही व्यक्तीला कुठलाही त्रास झालेला नाही व सदर लस ही पुर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिकेचे वौद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी केले. लसीकरण सत्रास आरोग्य विभागाच्या विभागीय पथकाने भेट दिली. यात पथक प्रमुख विभागीय पर्यवेक्षक अमित भंडारी यांचा समावेश होता.
कोट
कोरोनाविरुद्ध वर्षभर आपण लढत आहोत. फ्रंटलाईन वॉरिअर्सला प्रथमत: लस देण्यात येत आहे. ही मंडळी जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत आहेत.
- यशोमती ठाकूर,
पालकमंत्री
कोट
आरोग्य विभागाकडून लसीकरणासाठी ॲपद्वारे नोंदणी करूनच लस दिली जात आहे. यानंतर शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण पूर्ण केले जाईल.
- शौलेश नवाल,
जिल्हाधिकारी
कोट
ही लस सुरक्षित आहे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी मी लस घेतली आहे. वैद्यकक्षेत्रात सेवा बजावणारे अनेक फ्रंटलाईन वर्कर्स स्वत:हून लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.
- डॉ. अनिल रोहनकर,
जिल्हाध्यक्ष, आयएमए