इम्तियाज जलील यांच्यामुळे राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न
By गणेश वासनिक | Published: March 4, 2023 07:02 PM2023-03-04T19:02:46+5:302023-03-04T19:03:27+5:30
Amravati News राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वधर्मियांनी एकोपा ठेवावा, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी शनिवारी येथे केले.
अमरावती : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु,
राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वधर्मियांनी एकोपा ठेवावा, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी शनिवारी येथे केले.
ना. सत्तार यांनी अमरावती येथे आयोजित कृषी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान त्यांनी येथील शासकीय विश्रामभवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर येथे खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी आंदोलनात औरंगजेबाचा फोटो लावण्यावरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ना. सत्तार बोलत होते. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वांनी दक्षता घेणे काळाची गरज आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतरणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. वैयक्तिक कोणीही घेतलेला नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करताना खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन करताना या भावना जरूर जपायला पाहिजे. ज्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, ही बाब कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केली.
मुस्लिम समाज हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी
उद्धव ठाकरे यांची रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सभा आहे. या सभेला मुस्लिमांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केले. यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला, कुणी बोलले म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहत नाही, सर्व समाजाला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे, उद्धव ठाकरे यांच्या सभेचा मुस्लिम समाजावर काही परिणाम होणार नाही, मुस्लिम समाज एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही ना. सत्तार यांनी दिली.