बोंद्रेच्या सेवापुस्तिकेसाठी कायद्याचा कीस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:47 AM2017-12-31T00:47:22+5:302017-12-31T00:47:32+5:30
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वडीलबंधू मनोज गावंडे यांनी महापालिकेला सचिन बोंद्रे यांच्याविषयी संपूर्ण माहिती मागविली आहे. २१ डिसेंबरला माहिती अर्ज सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वडीलबंधू मनोज गावंडे यांनी महापालिकेला सचिन बोंद्रे यांच्याविषयी संपूर्ण माहिती मागविली आहे. २१ डिसेंबरला माहिती अर्ज सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाला. त्या अनुषंगाने उपलब्ध माहिती मनोज गावंडे यांना द्यावी की कसे, याबाबत विधी अधिकाऱ्याचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सकावर सुधीर गावंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असल्याने हे प्रकरण आता हायप्रोफाइल पठडीत मोडले जात आहे. सचिन बोंद्रे यांची महापालिकेतील सेवापुस्तिका या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. मात्र, माहिती अधिकारान्वये एखाद्या कर्मचाºयाची सेवापुस्तिका अन्य व्यक्तीला दिली जाऊ शकते का, असा प्रश्न सामान्य प्रशासन विभाग अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांना पडला. उगाचच ‘रिस्क’ नको म्हणून त्यांनी मग थेट नोटशीट चालवून याबाबत विधी अधिकाºयाचे मार्गदर्शन मागविले. विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाअंती बोंद्रे यांच्या सेवापुस्तिकेची सत्यप्रत द्यायची की कसे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सेवापुस्तिकेमध्ये शासकीय सेवेत लागल्यापासून रजा, कारवाई, पदोन्नती अशा प्रशासकीय बाबींची नोंद असते. संबंधितांचे प्रशासकीय कामकाजापासून सेवापुस्तिका ही त्या कर्मचाºयांसाठी सवाधिक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. या पार्श्वभूमीवर मनोज गावंडे यांच्या बंधूंनी मागितलेल्या माहितीला महत्त्व प्राप्त झाले आहे.