महापालिकेच्या ‘एलबीटी’त आर्थिक अफरातफर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:17 AM2018-10-01T01:17:26+5:302018-10-01T01:18:33+5:30

स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचा नियमित भरणा केल्यानंतरही ती रक्कम प्राप्त झाल्याचे नाकारून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची गंभीर तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

'LBT' financial fraud in municipal corporation! | महापालिकेच्या ‘एलबीटी’त आर्थिक अफरातफर !

महापालिकेच्या ‘एलबीटी’त आर्थिक अफरातफर !

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांकडे तक्रार : फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचा नियमित भरणा केल्यानंतरही ती रक्कम प्राप्त झाल्याचे नाकारून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची गंभीर तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. चालानद्वारे बँकेत भरणा केलेल्या एकूण रकमेपैकी ७६ हजार ४६५ रुपयांची संगणमत करून, खोटे हिशेब ठेवून अफरातफर केल्याने स्थानिक संस्था कर अधिकारी, लेखापाल, अंकेक्षक व अन्य जबाबदार अधिकारी कर्मचाºयांविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी विनंती महापालिका आयुक्तांना सादर तक्ररीतून करण्यात आली आहे.
कुळकर्णी आॅटोमोबाईल्सचे भागीदार, तुषार कुळकर्णी यांनी २५ सप्टेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाकडे ही तक्रार नोंदविली. सन २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ अशा तीन आर्थिक वर्षांचा स्थानिक संस्था कर व त्यावरील दंड म्हणून कुळकर्णी आॅटोमोबाईल्सला एकूण ५ लाख २४ हजार ३० रुपयांची नोटीस बजावण्यात आली. ही रक्कम २३ आॅगस्ट २०१८ पूर्वी भरण्याचे आदेश स्थानिक संस्था कर अधिकाºयाने दिले.
कुळकर्णी यांच्या तक्रारीनुसार महापालिकेने त्यांना पाठविलेल्या त्रिवार्षिक कर भरणा नोटीसमध्ये कुळकर्णी आॅटोमोबाईल्सने सन २०१२-१३ व सन २०१४ -१५ या दोन आर्थिक वर्षात एक रुपयाही भरला नाही. सन २०१३-१४ मध्ये फक्त ४३३९ रुपयांचा भरणा केल्याचे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात आपण सन २०१२-१३ मध्ये ३१८८१ रुपये, सन २०१३-१४ मध्ये ४४,३६६ रुपये व सन २०१४-१५ मध्ये ४,५५७ रुपयांचा भरणा केला. ही रक्कम बँकेत भरल्याचा पुरावा म्हणून चालानच्या पावत्या आपल्याकडे आहेत. असे असताना एकूण रकमेपैकी ४३३९ रुपये महापालिकेला प्राप्त झाले. उर्वरित रक्कम अप्राप्त असल्याचे खोटे हिशेब ठेवून आपल्याला ५ लाख २४ हजार ३० रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केला आहे. स्थानिक संस्था कर अधिकाºयांच्या मूल्यांकनानुसार, महापालिकेला चालानद्वारे बँकेत भरणा केलेल्या ८०,८०४ रुपयांपैकी केवळ ४३३९ रुपये प्राप्त झालेत. सबब, महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचाºयांनी संगणमताने खोटे हिशेब दर्शवून ७६४६५ रुपयांची आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. त्याअनुषंगाने महापालिकेत मोठ्या प्रमाणात झालेल्या अफरातफर व भ्रष्टाचाराबाबत आयुक्तांनीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
एसीबीकडे तक्रार
स्थानिक संस्था कर विभागातील चांडोले नामक कर्मचाऱ्यास ३० हजार रुपये लाच दिल्यास जुने हिशेब दाखविण्याची गरज नाही, अशी बतावणी करुन नोटीस बजावणाऱ्या कर्मचाऱ्याने चांडोले यांच्यावतीने लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे. लाच न दिल्यास तुमची संपत्ती जप्त करण्यात येईल, पोलीस तक्रार होऊन आपणास अटकही करण्यात येईल, अशी धमकी आपल्याला नोटीस घेतेवळी देण्यात आल्याचे कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

Web Title: 'LBT' financial fraud in municipal corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.