महावितरणची एलबीटी वसुली महापालिका मात्र अनभिज्ञ
By Admin | Published: November 19, 2014 10:30 PM2014-11-19T22:30:35+5:302014-11-19T22:30:35+5:30
शंभर रुपयांवर दोन टक्के दराने वीज ग्राहकांकडून वसूल केला जाणारा स्थानिक संस्था कर (एलबीटी) अद्यापपर्यंत महावितरण कंपनीने महापालिका तिजोरीत जमा केलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांकडून
गणेश वासनिक - अमरावती
शंभर रुपयांवर दोन टक्के दराने वीज ग्राहकांकडून वसूल केला जाणारा स्थानिक संस्था कर (एलबीटी) अद्यापपर्यंत महावितरण कंपनीने महापालिका तिजोरीत जमा केलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांकडून महिन्याकाठी वसूल होणारी एलबीटीची रक्कम किती? या आकडेवारीपासून महापालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
राज्य शासनाच्या २० फ्रेबुवारीच्या अधिसूचनेनुसार महापालिका क्षेत्रात वापरासाठी आयात होणाऱ्या विजेच्या किंमतीवर दोन टक्के दराने प्रती शेकडा एलबीटीची आकारणी करण्याचे ठरविण्यात आले. त्याअनुषंगाने महापालिकेने वीज वितरण कंपनीला १ आॅगस्टपासून ग्राहकांकडून एलबीटी वसूल करण्याची संमती दिली. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरण कंपनीने १०० रुपयांवर दोन टक्के एलबीटी आकारुन वीज ग्राहकांना देयके पाठविण्यास प्रारंभ केला.
वीज बिलात एलबीटीचा समावेश करून ती रक्कम वसूलदेखील केली जात आहे. महावितरणकडे एलबीटीची किती रक्कम जमा झाली, याची आकडेवारी महापालिका प्रशासनाकडे नाही. महावितरणचा असा बेधडक कारभार सुरू आहे.