दुचाकी, मोटरपंप, केबल चोरणारा अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात, तीन लाखांचा ऐवज जप्त
By प्रदीप भाकरे | Published: October 19, 2022 07:15 PM2022-10-19T19:15:22+5:302022-10-19T19:17:19+5:30
दुचाकी, मोटरपंप, केबल चोरणाऱ्या गुन्हेगाराला एलसीबीने अटक केली आहे.
अमरावती : मोर्शी व वरूड तालुक्यातून दुचाकी, मोटरपंप व केबल वायर चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरिक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील टिमने १९ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. अशोक मोहन युवनाते (रा. फंडरपाटी ता. वरुड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
मोर्शी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदविला होता. त्या गुन्ह्यातील दुचाकी अशोक युवनाते याच्याकडे असल्याची खबर एलसीबीला मिळाली. त्यावरून १८ ऑक्टोबर रोजी दुपारी पांढरघाटी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यास दुचाकीबाबत विचारपूस केली असता प्रथमतः त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र पुढे पोलीसी खाक्या बसताच त्याने त्या दुचाकी चोरीची कबुली दिली. सोबतच त्याने मोर्शी, वरुड येथून सहा दुचाकी चोरी केल्या असून त्यातील चार दुचाकी मध्यप्रदेशमधील रोहना, मांजरी, ईटावा येथे विकल्याची कबुली दिली. त्याच्याकडून त्या २.९७ लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पाणबुडी मोटरही चोरल्या
वरुड हददीतील जरूड, वरुड, रोशनखेडा, खडका येथिल शेतशिवारातून पाणबुडी मोटर व केबल व ईसब्री पाळा, भाईपुर, मेंघवाडी शेतशिवारामधुन केबल वायर चोरी केल्याची कबुली त्याने दिली. मोर्शी, बेनोडा आणि वरूड येथील चोरीचे १५ गुन्हे ऊघडकिस आले. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक शशीकांत सातव, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन गुलपार, संतोष मुंदाने, रविंद्र बावने, बळवंत दाभने, दिपक सोनाळेकर, चंद्रशेखर खंडारे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, हर्षद घुसे हे कारवाईत सहभागी झाले.