मालखेड, भानखेड परिसरात पट्टेदार वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:16 PM2018-10-24T22:16:22+5:302018-10-24T22:16:44+5:30
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन जणांसह दोन म्हैशी व कालवडीला ठार करणारा तो नरभक्षक वाघ मालखेड, भानखेडा परिसरात एका शेतकऱ्यांसह वाहनधारकांना सोमवारी दिसला. त्यामुळे परिसरातील नागरिंकांमध्ये त्या वाघाची दहशत पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन जणांसह दोन म्हैशी व कालवडीला ठार करणारा तो नरभक्षक वाघ मालखेड, भानखेडा परिसरात एका शेतकऱ्यांसह वाहनधारकांना सोमवारी दिसला. त्यामुळे परिसरातील नागरिंकांमध्ये त्या वाघाची दहशत पसरली आहे.
तालुक्यातील मालखेड रेल्वे येथील शेतकरी पुंडलिकराव सुने हे सोमवारी सकाळी ९.४५ वाजता शेतात गेले असता, त्यांना एक पट्टेदार वाघ दिसला. सदर वाघ मालखेड परिसरात भ्रमण करीत असताना सायंकाळी ५.३५ वाजता चांदूर रेल्वेहून पोहरा, भानखेडमार्गे अमरावतीकडे निघालेल्या चांदूर रेल्वे येथील विनय कडू व स्वप्निल मानकर यांना भानखेड जंगल परिसरात दिसला. वाघ अचानक कारसमोर आल्याने त्यांना ब्रेक मारून जागेवरच वाहन थांबवावे लागले. त्यांनी अवघ्या १० ते १५ फुटांवरूनच पट्टेदार वाघ बघितल्याचे ते म्हणाले. त्यानंतर या वाघाने भानखेड येथील मातोश्री वृद्धाश्रमाकडे प्रस्थान केल्याचे सांगण्यात आले. त्यांनी गावातील लोकांना, रस्त्याने जाणाऱ्यांना सांगून सावधतेचा इशारा दिला. यासोबत आता या दुसऱ्या पट्टेदार वाघाच्या दर्शनाने तालुक्यातील नागरिकांच्या भीतीत अजून भर पडली आहे. यामुळे आता दुचाकीने प्रवास करणाºयांना सावध राहणे गरजेचे आहे. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अंजनसिंगीपासून ३० किमी अंतर असलेल्या पोहरा, चिरोडी जंगलात तो वाघ येण्याची शक्यता पाहता वनविभागाने पोहरा, चिरोडी, माळेगाव, बडनेरा अशा सहा वनवर्तुळालगतच्या गावांना सतर्क राहण्याबाबत नोटीस दिली असून, वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविली आहे, असे वनाधिकारी आशिष कोकाटे म्हणाले.