रेल्वेने जाणाऱ्या ऑक्सिजन टँकला गळती; प्रशासनाची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 05:00 AM2021-06-09T05:00:00+5:302021-06-09T05:00:31+5:30
गुजरातच्या मुंद्रा बंदरातून आंध्र प्रदेशातील शांतानगर येथे एका कंपनीचे ऑक्सिजन भरलेले टँक रेल्वेने वाहून नेले जात होते. सोमवारी रात्री दहा वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर एका टँकमध्ये लीकेज झाल्याची बाब लक्षात येताच सदर गाडी रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर उभी करण्यात आली. बारा तास उलटल्यानंतरही टँकमधून लीकेज सुरूच होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : रेल्वेने जाणारे ऑक्सिजन टँक लीक झाल्याची बाब बडनेरा रेल्वे स्थानकावर सोमवारी उशिरा रात्री लक्षात आली. यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. दुसऱ्या दिवशी पावसामुळे लीकेज थांबले, असे सूत्रांनी सांगितले.
गुजरातच्या मुंद्रा बंदरातून आंध्र प्रदेशातील शांतानगर येथे एका कंपनीचे ऑक्सिजन भरलेले टँक रेल्वेने वाहून नेले जात होते. सोमवारी रात्री दहा वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर एका टँकमध्ये लीकेज झाल्याची बाब लक्षात येताच सदर गाडी रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर उभी करण्यात आली. बारा तास उलटल्यानंतरही टँकमधून लीकेज सुरूच होते. त्यासाठी तंत्रज्ञ बोलाविण्यात आले, मात्र त्यांनी दुरुस्ती करण्यापूर्वी पावसामुळे लीकेज थांबले, असे सांगण्यात आले. नेमके लिकेज कशामुळे झाले, हे मात्र कळू शकले नाही. बडनेरा रेल्वे स्थानकाचे अधिकारी, सुरक्षा बलाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांची या घटनेमुळे तारांबळ उडाली होती. कर्मचारी त्याठिकाणी तैनात करण्यात आले. ऑक्सिजन टँक रुग्णांच्या उपचारासाठी नेले जात असल्याची माहिती मिळाली.
पाऊस आला अन् पुढील अनर्थ टळला
बडनेरा रेल्वे स्थानकावर ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या रेल्वे टँकला सोमवारी रात्री १० च्या सुमारास अचानक आग लागली. काही तरी अनर्थ घटना घडेल, असे वातावरण निर्माण झाले. मात्र, तेव्हाच पाऊस आला आणि पुढे होणारा अनर्थ टळला. हे टँक खासगी आस्थापनेचे होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी रात्री १० पासून मंगळवारी रात्री उशिरापर्यंतदेखील या टॅंकच्या दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ पोहोचले नव्हते. पाऊस आला नसता, तर टँकला आगीच्या विळख्याने वेढले असते आणि मोठे नुकसान झाले असते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.