शिका, पण आता समजदारीनेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:14+5:302021-07-15T04:11:14+5:30
बच्चू कडू : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वेगळ्या पधतीची चालना अमरावती : कोरोनाने सर्वांचीच स्थिती बिघडली आहे. अशात विद्यार्थ्यांंच्या शिक्षणाचा मोठा ...
बच्चू कडू : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वेगळ्या पधतीची चालना
अमरावती : कोरोनाने सर्वांचीच स्थिती बिघडली आहे. अशात विद्यार्थ्यांंच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येणारा काळ रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षणाचाच असेल. विद्यार्थ्यांंना समाजाधारित शिक्षण देण्यावर व त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक घडविण्याचे ठोस काम आता होईल. पण, पालकांनो आता पाल्यांना शिकवा समजदारीनेच, अशा सूचना वजा सल्ला राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आभासी पद्धतीने आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना ना. कडू बोलत होते. आपल्या शिक्षणात शेती, उद्योग व व्यवसायाला स्थानच नाही. त्यामुळे या तीन बाबींचादेखील शिक्षणात समावेश व्हावा. त्यासोबतच विद्यार्थी शिकत असताना त्यांच्यातील त्या व्यवसायनुरूप बाबींचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवून त्या विद्यार्थ्यांंना त्या पद्धतीने घडविण्यावर भर द्यावा लागेल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगीसुद्धा गुणवत्ता असते. पण पारंपरिक शिक्षणाने ती समोर येत नाही. मात्र, आता राज्याचा शालेय शिक्षण विभाग याबाबत सकारात्मकच कृती करणार असल्याचा विश्वास व ग्वाही बच्चू कडू यांनी दिली. तीन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेत अमरावती विभागातील विविध क्षेत्रात नैपुण्यप्राप्त अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यांचे सहा गट तयार करण्यात आले असून, विविध बारकाव्यांवर अभ्यास व निरीक्षण ते नोंदवून एक ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, स्वीय सहायक राहुल मोहोड, अधिव्याख्याता प्रशांत डवरे यांच्यासह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक उपस्थित होते.