लीज २५ वर्षांचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:18 PM2018-02-24T22:18:38+5:302018-02-24T22:18:38+5:30
महापालिकेच्या अख्त्यारित व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिजचा कालावधी २५ वर्षे निश्चित करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिकेच्या अख्त्यारित व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिजचा कालावधी २५ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. सर्व संकुलातील गाळ्यांसह भाडेपट्टी संपल्यानंतर नव्याने प्रस्तावित प्रत्येक लिजचा कालावधीही २५ वर्षांचाच असेल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी २७ फेब्रुवाीला विशेष आमसभा बोलावण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रातील दादासाहेब खापर्डे संकुल, प्रियदर्शनी व्यापारी संकूल व महात्मा गांधी व्यापारी संकूल बडनेरा या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिज कालावधी संपुष्टात येत असल्याने सदर गाळ्यांचे वाटप प्रक्रिया व धोरण निश्चितीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता ही विशेष आमसभा होईल. शुक्रवारी यासंदर्भात महापालिका आयुक्तांच्या दालनात सर्वपक्षीय पदाधिकाºयांची बैठक झाली व विशेष आमसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दादासाहेब खापर्डे संकुलातील गाळ्यांचे भाडे १९४ रुपये प्रति चौरसफूट प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. जयस्तंभ चौकातील प्रियदर्शनी संकुलाची लिज जानेवारी २०१८ मध्ये संपुष्टात आल्याने तेथील गाळ्यांचे भाडे मासिक ६० रुपये चौरस फूट निश्चित करण्यात आले. तर बडनेरा येथील महात्मा गांधी व्यापारी संकुलातील प्रत्येक दुकानदाराला ७६ रुपये प्रती चौरस मीटर भाडे निश्चित करण्यात आले आहे.
तीनही संकुलातील गाळ्यांची वितरण प्रक्रिया जळगाव मनपाच्या धर्तीवर आॅनलाईन लिलाव पद्धतीने केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमिवर धोरणनिश्चित करण्यात येणार आहे. त्याकडे व्यावसायिकांचे लक्ष आहे.
रेडीरेकनरचे दर
बीओटी तत्त्वावरील बहुतांश सर्व गाळ्यांचे करार प्रती चौरसफुट १ रुपये आहे. त्यामुळे महापालिकेला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे आता नव्याने गाळे वितरण पद्धती वा धोरण ठरविताना रेडीरेकनरच्या दरानुसार मासिक भाडे आकारले जाईल. त्यावर मंगळवारच्या आमसभेत शिक्कामोर्तब होईल.