पट्टेदार वाघाने केली हरणाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:36+5:302021-03-19T04:13:36+5:30
वरूड : शेतात ओलित करण्यास गेलेल्या शेतकऱ्याला पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. इतकेच नव्हे तर वाघाच्या डरकाळीने शेतकऱ्याची ...
वरूड : शेतात ओलित करण्यास गेलेल्या शेतकऱ्याला पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. इतकेच नव्हे तर वाघाच्या डरकाळीने शेतकऱ्याची पाचावर धारण बसली. त्या वाघाने हरणाची शिकार केल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. महेंद्री शिवारात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
सातपुड्याच्या पर्वतरांजीतील महेंद्री जंगलात वाघ, पट्टेदार वाघ, कोल्हा, बिबट, हरण, रानडुक्कर आदींचे वास्तव्य आहे. परिसरातील शेतकरी दिवसा वीज नसल्यामुळे रात्रीला ओलित करण्यासाठी जातात. शंकर डोमने व धिरज सावरकर हे दोघे आठ दिवसांपूर्वी ओलितासाठी गेले असता, रात्री ९ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ दिसला. त्या दिशेने टॉर्च मारला असता डरकाळी फोडली. घाबरून दोघेही घरी परतले. गुरुवारी पुन्हा वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांत भीती दाटली आहे. महेंद्री शिवारात वाघाचे पायाचे ठसे आढळून आल्याच्या वृत्ताला वनाधिकारी प्रशांत लांबाडे यांनी दुजोरा दिला.