राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेवर अमेरिकेतील चर्चमध्ये व्याख्यान
By admin | Published: October 28, 2015 12:24 AM2015-10-28T00:24:58+5:302015-10-28T00:24:58+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तेजस्वी कार्याने भारावलेले अमेरिकेचे 'बेस्ट सेलर' लेखक व मोटिव्हेश्नल स्पिकर विल हॅरीस यांनी ...
गजानन मोहोड अमरावती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तेजस्वी कार्याने भारावलेले अमेरिकेचे 'बेस्ट सेलर' लेखक व मोटिव्हेश्नल स्पिकर विल हॅरीस यांनी अमेरिकेतील व्हर्जीनीया प्रांतातील सर्वात मोठ्या एनएसएसी फॉल या चर्चमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वैश्विक भूमिका व ग्रामगीता यावर १ जून रोजी ३० मिनिटे व्याख्यान दिले.
एनएसएसी फॉल हे चर्च अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मियांचे सर्वात मोठे चर्च आहे. तेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासुद्धा प्रार्थनेला जातात. तेथील व्याख्यानाचे प्रसारण अमेरिकेतील विल पॉवर रेडिओ या केंद्रावरुनसुद्धा करण्यात आले. राष्ट्रसंतांचे विचार हॅरीस यांच्या तोंडून ऐकून मंत्रमुग्ध झालेले उपस्थित धर्मगुरु व अमेरिकन नागरिक राष्ट्रसंतांच्या मौन श्रद्धांजलीदिनी येथे येणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनकार्यावर अमेरिकेत नामवंत लेखक विल हॅरीस लघुचित्रपट तयार करीत आहेत. हा लघुचित्रपट अमेरिकेतील फॉक्स, सिनबीसी व एबीसी या वाहिन्यांवर वर्षाच्या शेवटी प्रदर्शित करण्याचा त्यांचा मानस आहे.
भर मे महिन्यात गुरुकुंजात केला मुक्काम!
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य व साहित्याचा अभ्यास करण्यासाठी विल हॅरीस यांनी मे महिन्यात गुरुकुंज आश्रम, राष्ट्रसंतांचे गुरू संत आडकोजी महाराज यांचे श्रीक्षेत्र वरखेड व राष्ट्रसंतांचे जन्मस्थान यावली येथे पंधरा दिवस घालविले. गुरुकुंज आश्रमातील दिनचर्येत त्यांनी सामुदायिक प्रार्थना व ध्यान अनुभवले.
राष्ट्रसंतांबाबतची माहिती त्यांनी राष्ट्रसंतांसोबत जीवन घालविलेल्या वरखेड, यावली, चिमूर येथील सेवकांकडून तसेच राष्ट्रसंतांचे तत्कालीन सचिव जनार्दनपंत बोथे, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी व राष्ट्रसंतांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक रुपराव वाघ, अध्यात्म विभागप्रमुख राजाराम बोथे यांच्याकडून जाणून घेतली.
कोण आहेत विल हॅरीस?
विल हॅरीस हे अमेरिकेतील प्रख्यात लेखक असून त्यांचे 'विल पॉवर नाऊ' हे बेस्ट सेलर पुस्तक आहे. अमेरिकेतील ते प्रख्यात प्रेरक व्याख्याते म्हणून परिचित आहेत. त्यासाठी तासाला साडेतीन लक्ष रुपये आकारतात. बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये उल्लेखनीय कार्य केले. 'विल पॉवर प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी भारतात सामाजिक कार्यासाठी स्थापन केली.