अंजनगावातील निकृष्ट डाळीचा प्रश्न विधानसभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:40 PM2019-07-02T22:40:16+5:302019-07-02T22:40:29+5:30
अंजनगावात वितरीत करण्यात येत असलेल्या निकृष्ट चणा डाळीचा प्रश्न आ. रमेश बुुंदिले हे विधानसभेत उपस्थित करणार आहेत. त्यांच्या पत्रावर संबंधित पुरवठादार कंपनीवर कारवाईचे नागरी पुरवठा मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. निकृष्ट डाळीचे वितरण होत असल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने उजेडात आणला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : अंजनगावात वितरीत करण्यात येत असलेल्या निकृष्ट चणा डाळीचा प्रश्न आ. रमेश बुुंदिले हे विधानसभेत उपस्थित करणार आहेत. त्यांच्या पत्रावर संबंधित पुरवठादार कंपनीवर कारवाईचे नागरी पुरवठा मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. निकृष्ट डाळीचे वितरण होत असल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने उजेडात आणला होता.
राज्य शासनाच्यावतीने दारिद्र्यरेषेखालील, अंत्योदय लाभार्थींना एक वर्षापूर्वी तूर डाळीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये चणा डाळीचे वाटप होणार होते. तथापि, त्याचे वितरण जून महिन्यात करण्यात आले. जिल्हास्तरावरून डाळ तपासण्याची तसदी न घेता ती पाकिटे ग्रामीण व शहरी भागात पाठवून दिली. रेशन दुकानावरून घरी नेलेल्या डाळीची पाकिटे फोडली असता, डाळ एकमेकाला चिकटून घट्ट गोळा झाल्या होता. त्यातच त्यामध्ये दुर्गंधी येत होती. जागरूक नागरिकांच्या मदतीने ‘लोकमत’ने ही वस्तुस्थिती लोकदरबारात मांडली. निकृष्ट डाळीचे वाटप बंद करण्यात आले. मात्र, वरिष्ठ अधिकारी तसेच गोडाऊन कीपर उडवाउडवीची उत्तरे देऊन एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार करीत होते.
दरम्यान, आमदार रमेश बुंदिले यांनी निकृष्ट चणा डाळ अन्न व पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढ्यात मांडली आणि लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे आ. बुंदिले म्हणाले. हा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांच्या पुढच्या पावलाकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता शासन स्तरावरून कारवाईची अपेक्षा आहे.