महापालिकेत लेखणीबंद आंदोलन
By admin | Published: May 30, 2014 11:20 PM2014-05-30T23:20:19+5:302014-05-30T23:20:19+5:30
मार्च, एप्रिल व मे महिन्याचे कर्मचार्यांचे वेतन थकीत असल्याचा मुद्दा महापालिकेत पेटला. दरमहा नियमित वेतनासाठी शुक्रवारपासून कर्मचार्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केल.
नियमित वेतनाचा मुद्दा : द्वारसभा घेऊन प्रशासनाचा निषेध
अमरावती : मार्च, एप्रिल व मे महिन्याचे कर्मचार्यांचे वेतन थकीत असल्याचा मुद्दा महापालिकेत पेटला. दरमहा नियमित वेतनासाठी शुक्रवारपासून कर्मचार्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केल. व्दारसभा घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदविला.
महानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोयी सुविधांची जबाबदारी सांभाळणार्या महापालिकेवर स्वत: कर्मचार्यांच्या वेतनाची व्यवस्था कोठून करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने कर्मचार्यांना संपाचे हत्यार उपसण्याचा प्रसंग कसा निर्माण झाला, याचे चिंतन अधिकारी आणि पदाधिकार्यांनी करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक संस्था कर(एलबीटी), मालमत्ता कर, बाजार परवाना विभागाचे उत्पन्न, सहायक संचालक नगररचना विभागातून येणार्या उत्पन्नावरच महापालिकेचा डोलारा चालतो. मात्र या विभागातून येणारे उत्पन्न व कार्यरत कर्मचार्यांची कामाप्रती असलेली निष्ठा तपासून पाहणे हेसुध्दा आवश्यक झाले आहे. हल्ली महापालिकेचा कारभार म्हणजे ‘आमदनी अठन्नी, खर्चा रूपय्या’ या म्हणीनुसार सुरू आहे. कोणतेही विकास कामे न करता प्रशासानाला दरमहा १0 कोटी रूपये केवळ कर्मचार्यांचे वेतन, साफसफाई खर्च, सेवानवृत्ती वेतन, पाणी पुरवठा, विद्युत देखभाल, नगरसेवक मानधन व वैकल्पिक वाहन भत्ता, उद्यान निगा राखणे, टेलिफोन देयके आदी वर खर्च करावा लागतो. उत्पन्न घसरल्याने नियोजन बिघडत चालल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.मात्र कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांना वेतन मिळालेच पाहिजे, ही न्यायीक मागणी पुढे रेटत महापालिका कर्मचारी कामगार संघाने संपाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाने नियमित वेतन देण्यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी नाही तर बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी दिला आहे. व्दारसभेत निषेध करताना प्रल्हाद कोतवाल, मंगेश वाटाणे, एम.जे. दंदे, आर. दिघडे, कमलाकर जोशी, प्रतिभा घंटेवार, सविता पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)