विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन, विद्यापीठाची सिनेट सभा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:11 AM2020-12-26T04:11:39+5:302020-12-26T04:11:39+5:30

अमरावती : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन झाले. जिल्हा परिषद, महापालिका सर्वसाधारण सभा यादेखील ऑफलाईन होत आहेत, तर मग २९ ...

Legislative session offline, why not university senate meeting? | विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन, विद्यापीठाची सिनेट सभा का नाही?

विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन, विद्यापीठाची सिनेट सभा का नाही?

Next

अमरावती : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन झाले. जिल्हा परिषद, महापालिका सर्वसाधारण सभा यादेखील ऑफलाईन होत आहेत, तर मग २९ डिसेंबर राेजी होऊ घातलेली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट सभा ऑफलाईन का नाही, असा सवाल नुटाचे अध्यक्ष प्रवीण रघुवंशी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला आहे.

सिनेट सभा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, याबाबत ३३ सिनेट सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना देण्यात आले. मात्र, सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तब्बल ९ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सिनेट सभा होत आहे. असे असताना विद्यार्थी, शैक्षणिक दर्जा, प्रशासकीय कामकाजात सुधारणा याविषयी कुलगुरू चांदेकर यांना काहीही घेणे-देणे नाही, असा एककल्ली कारभार सुरू असल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविलेल्या पत्रानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याचा आधार घेत कुुलगुरू पळपुटे धोरण अवलंबित आहे. कुलगुरू चांदेकर यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी सहा महिने राहिले आहे. त्यामुळे कुलगुरुंना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरप्रकरणावर पडदा टाकायचा असून, ते केवळ फसवेगिरी करीत असल्याचा आरोप सिनेट सदस्य विवेक देशमुख, प्रवीण रघुवंशी, प्रदीप देशपांडे, उत्पल टोंगो, नितीन खर्चे, सुनील मानकर यांनी केला आहे. कुलगुरुंच्या अफलातून कारभाराविरोधत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दाद मागितली जाणार आहे. यावेळी संतोष ठाकरे, भीमराव वाघमारे, सतेश्वर मोरे आदी उपस्थित होते.

-------------------

‘विथहेल्ड’निकालाच्या गर्दीने कोरोना होत नाही का?

सिनेट सदस्य एकत्र आल्यानंतर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याचे विद्यापीठ प्रशासन सांगत आहे. मात्र, दरदिवशी ८०० ते १००० विद्यार्थी ‘विथहेल्ड’निकालाची समस्या सोडविण्यासाठी येत असताना तेव्हा कोरोना होत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुद्दाम काही सिनेट सदस्यांचे प्रश्न नाकारण्यात आल्याचा आरोप प्रदीप देशपांडे यांनी केला.

--------------------------

कोट

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना सिनेट सभा घेण्याबाबत मार्गदर्शन मागितले होते. कलम १४४ लागू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी पत्राद्धारे कळविले आहे. त्यामुळे सिनेट सभा ऑनलाईन घेण्यात येत आहे. वैयक्तिकपणे कुणाचेही प्रश्न नाकारले नाही. यापूर्वी ऑफलाईन सभा घेण्यात आल्या आहे.

- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

Web Title: Legislative session offline, why not university senate meeting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.