आमदार, आयुक्तांतर्फे खापर्डे वाड्याची पाहणी
By admin | Published: December 5, 2015 12:11 AM2015-12-05T00:11:26+5:302015-12-05T00:11:26+5:30
ऐतिहासिक खापर्डे वाड्याला आ. रवी राणा व महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शुक्रवारी भेट दिली. अज्ञात व्यक्तीने पाडलेल्या इमारतीच्या भिंतीची पाहणीही त्यांनी केली.
गुडेवारांनी केली आरती : गजाननभक्तांसाठी झुणका-भाकर
अमरावती : ऐतिहासिक खापर्डे वाड्याला आ. रवी राणा व महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शुक्रवारी भेट दिली. अज्ञात व्यक्तीने पाडलेल्या इमारतीच्या भिंतीची पाहणीही त्यांनी केली. संत गजाननाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळावर मंदिर उभारून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि शेगाव येथे पायी वारीत गेलेल्या भाविकांना झुणका-भाकरीचा प्रसाद देण्यात येईल, असे आ. राणा म्हणाले.
सोमवारी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता व त्यांच्या चमूने खापर्डेवाड्याच्या इमारतीसह समोरच्या दुकानांची मोजणी केली होती. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने इमारतीच्या प्रवेशद्वारावरील काही भाग पाडला. टिनांचे शेडही कोसळले. त्यामुळे या वाड्याचे जतन करण्याऐवजी नेस्तनाबूत करण्याचा कट रचला जात असल्याची भावना गजाननभक्तांनी व्यक्त केली आहे.
प्राचीन विहिरीची केली पाहणी
अमरावती : या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आ.राणा खापर्डे वाड्यात पोहोचले आणि त्यांनी आयुक्तांना पाचारण केले. तेथे त्या दोघांमध्ये चर्चा झाली. या वाड्याची जागा संपादित करण्याचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवावा, असे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिलेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची फाईल मागविली आहे. हा प्रश्न शासनस्तरावर चर्चिला जात असताना वाड्याला धक्का लागलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करून आ. राणांनी इमारत तोडण्यामागे ज्या कुणाचा हात असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पश्चात आ. राणा व आयुक्त गुडेवार यांनी गजानन भक्तांसमवेत श्रींची आरती केली. भक्तांनी संत गजाननाचा जयघोष केला. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहर कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार आर.के.शर्मा, उपनिरीक्षक सुशील चोरे, नगरसेवक सुनील काळे, माजी नगरसेवक बबन रडके, राजेंद्र परिहार, अजय मोरय्या, संजय हिंगासपुरे, सचिन भेंडे, अमर तरडेजा, संजय देशमुख, प्रकाश गावंडे, नंदू अनासाने, विनोद रायबागकर, पप्पू राठोड, सुनंदा पाटील, लक्ष्मी शर्मा, आनंद धवने आदींसह शेकडो भक्तांची उपस्थिती होती.
खापर्डेवाड्यात आले असताना श्री संत गजानन महाराज येथील प्राचीन विहिरीजवळ काही वेळ बसले होते. त्यामुळे या विहिरीचे मोठे महात्म्य आहे. मात्र, सद्यस्थितीत या विहिरीची दुर्दशा झाली असून येथे केरकचरा टाकला जातो. त्यामुळे विहीर दृष्टीस पडत नाही. त्यामुळे खोलवर पाणी असलेल्या या विहिरीत आजवर ९ लोक पडले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. परंतु येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विहिरीत साचलेला अनावश्यक गाळ काढून सुरक्षिततेच्या दृष्टीने कठडे बसवावेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)