लिंबू, संत्री, आवळ्याने बरा होतो प्रदूषित कर्करोग, त्वचारोग....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 07:00 AM2019-01-26T07:00:00+5:302019-01-26T07:00:02+5:30
जीवनसत्व ‘क’ चा मनुष्याच्या शरीरात पुरवठा झाल्यास कर्करोग, त्वचारोग व रक्ताक्षय अशा जीवघेणी आजारापासून मुक्ती मिळेल, असा शोधनिबंध ठाणे जिल्ह्यातील सहायक प्राध्यापक शरद महाजन यांनी सादर केला आहे.
गणेश वासनिक।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जमिनीतील जाड धातूयुक्त आणि अति प्रदूषित पाणी मुनष्याला प्यावे लागत असल्याने शरीरावर आघात होते. मात्र, जीवनसत्व ‘क’ चा मनुष्याच्या शरीरात पुरवठा झाल्यास कर्करोग, त्वचारोग व रक्ताक्षय अशा जीवघेणी आजारापासून मुक्ती मिळेल, असा शोधनिबंध ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील के. वि. पेंढरकर महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक शरद महाजन यांनी सादर केला आहे.
‘गोड्या पाण्यातील शिंपल्याच्या पचनग्रंथीत होणाऱ्या ‘आर्सेनिकॉसीस’ या सदोषावर जीवनसत्व ‘क’ उपायात्मक भूमिका’ या विषयावरील त्यांच्या शोध प्रबंधाला अमरावती विद्यापीठाने द्वितीय क्रमांकाने गौरविले आहे. केंद्रीय अनुदान आयोग, प्राणीशास्त्र विभाग व आयक्यूसी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २२ व २३ जानेवारी रोजी प्राणीशास्त्रावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. यावेळी शरद महाजन यांनी पश्र्चिम बंगाल, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका हा भारतातील ‘आर्सेनिक बेल्ट’ असल्याचे भूगर्भशास्त्राचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.
काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी होत आहे. कुपनलिकेतून अनियंत्रित पाण्याचा उपसा वाढला आहे. भूजलस्तर खोलवर गेले आणि गढूळ पाणी मनुष्याला प्यावे लागत आहे. कीटकनाशकांचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर वाढला आहे. वाढत्या लोकसंख्येने प्रदूषण पातळी उंचावली आहे. त्यामुळे जमिनीतील जड धातूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गढूळ, क्षारयुक्त आणि अतिप्रदूषित पाण्यामुळे शंख, शिंपल्याच्या जीवनावर झालेला परिणामावर महाजन यांनी यशस्वी प्रयोग केला. प्रदूषणाने झालेले कर्करोग, त्वचारोग आणि रक्ताशयावर ‘क’ जीवनसत्वाने मात करता येते. जाड धातूयुक्त, अतिप्रदूषित पाण्यामुळे शिंपल्यावर परिणाम झाला. तेच निकष मानवालादेखील लागू होते, हे त्यांनी शोधप्रबंधात मांडले आहे. ‘क’ जीवनसत्व पाण्यामध्ये द्रावणीय अवस्थेत ऋण आयर्न तयार करतात. त्याचा संयोग होऊन धातूंच्या धनमुलकांशी संयोग होऊन उदासिनीकरण होते. तो क्षार मुत्राकडे उत्सर्जित केला जातो. त्यामुळे धातूंचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम टाळता येतो. धातू प्रदूषणाचा मनुष्याच्या शरीरावर आघात झाल्यास ‘क’ जीवनसत्व असलेले लिंबू, संत्री, आवळा सेवन केल्यास कर्करोग, त्वचारोग, रक्ताशय असे आजार टाळता येते. मनुष्य, गिनी पिग्ज आणि माकडवर्गीय प्राण्यांमध्ये जीवनसत्व ‘क’ होऊ शकत नाही. त्यामुळे आहारात दररोज १० ते २० मिली ग्रॅम इतकेच किंवा त्यापेक्षा ‘क’ जीवनसत्वाचे सेवन झाल्यास ‘स्कर्व्ही’ या विकाराबरोबरच इतर शरीर प्रक्रियांवर ताण पडतो. पाणी उकळून प्यायल्याने रोगजीव मरतात. मात्र, त्यातील क्षाराची मुख्यत: धातूच्या क्षारांची मात्रा कमी होत नसते, हीे बाब लक्षात घेण्याजोगी आहे. ‘क’ जीवनसत्व पाण्यामध्ये द्रावणीय अवस्थेत ऋण आयर्न तयार करतात व त्याचा संयोग होऊन धातुंच्या धनमुलकांशी संयोग होऊन उदासिनीकरण होते. तो क्षार मुत्राकडे उत्सर्जित केला जातो. त्यामुळे धातूंचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम टाळता येतो. महाजन यांनी शोधप्रबंधात पूर्वप्रतिरक्षात्मक व उपचारात्मक असे दोनही प्रकारे सकारात्मक परिणाम धातू प्रदूषणाच्या प्रति मिळालेले दिसून येतात. या शोधप्रबंधासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील सुरेशचंद्र झांबरे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
अशा कराव्यात उपाययोजना
- विहिरींची जलपातळी खोलवर जात असल्याने वर्षाकाठी प्रयोगशाळेतून जलपरिक्षण करावे
- कूपनलिकेची खोली वाढविण्यासाठी पावसाळ्यात नवतंत्रज्ञानाने पुर्नजिवीत करणे
- लिंबू किंवा लिंबूवर्गीय फळे सेवन करणे. उदा. संत्रा, लिंबू, आवळा, देशी चिंच, आमसूल, पेरू आदी
- डबाबंद अन्न, मासे किंवा औषधे जास्त दिवस घरात साठवून ठेवू नये
‘गोड पाण्यातील शिंपल्याच्या पचनग्रंथीत होणाऱ्या ‘आर्सेनिकॉसीस’ या सदोषावर जीवनसत्व ‘क’ उपायात्मक भूमिका’ या विषयावरील शोधप्रबंधाला दुसरा क्रमांकाने गौरविले आहे. आवळा, लिंबू, पेरू, संत्राज्यूस सेवन केल्यास विविध रोगावर मात शक्य आहे, हे शरद महाजन यांच्या शोधनिबंधातून सिद्ध होते.
- एच.पी. नांदूरकर,
प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, अमरावती विद्यापीठ