मांजरखेड कसबा शिवारात बिबट्याचा गुराख्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:36+5:302021-05-31T04:10:36+5:30

जखमीवर उपचार : हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिले निवेदन चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड शिवारात बिबट्याने गुरे ...

Leopard attack on cattle in Manjarkhed Kasba Shivara | मांजरखेड कसबा शिवारात बिबट्याचा गुराख्यावर हल्ला

मांजरखेड कसबा शिवारात बिबट्याचा गुराख्यावर हल्ला

Next

जखमीवर उपचार : हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिले निवेदन

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड शिवारात बिबट्याने गुरे चारणाऱ्यावर मागून येऊन हल्ला केल्याची घटना २९ मे रोजी दुपारी ४.३० वाजता घडली. यात गुराखी जखमी झाला. मांजरखेड (कसबा) व बासलापूर शिवारात वावर असलेल्या या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले.

रवींद्र शिवदास पवार (३२, रा. तरोडा) असे जखमीचे नाव आहे. ते चारण्यासाठी गुरे घेऊन मांजरखेड शिवारात गेले होते. दुपारी ४.३० वाजता कालव्याजवळून गुरे परत आणत असताना पाठीमागून बिबट्याने रवींद्र पवार यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने सोबतीला असलेले काही जण धावून आले व त्यांनी काडी फेकून मारल्याने बिबट पळून गेला. सदर व्यक्तीला उजव्या हाताला व पाठीला मार असून दाताचे निशाणसुद्धा दिसले. यानंतर जखमी रवींद्र पवार यांना त्वरित चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणून प्रथमोपचार करण्यात आले. रुग्णालयाला ठाणेदार मगन मेहते, कॉन्स्टेबल महेशप्रसाद, चालक जगदीश राठोड तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली.

अन्यथा वनविभाग कार्यालयात आंदोलन करू

बिबट्याने यापूर्वी मांजरखेड शिवारात जनावरे फस्त केली आहेत. त्याचा बंदोबस्त करण्याची मागणाी वनविभागाकडे केली असता, त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही चांदूर रेल्वेच्या वनविभाग कार्यालयात तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकरी तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख गजानन बोबडे यांनी दिला.

बॉक्स २

जखमीला मिळणार आर्थिक मदत

मांजरखेड कसबा परिसरात बिबट्याने तीन दिवसांपूर्वी एका निलगायीची शिकार केली. त्याच भागात जनावरे चरायला गेल्यामुळे शिकारीच्या रक्षणार्थ बिबट्याने गुराख्यावर हल्ला केला असावा. जखमी गुराख्याला डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार औषधोपचारासाठी शासनाची मदत मिळेल. बिबट्या सतत भटकत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता, असे चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी सांगितले.

Web Title: Leopard attack on cattle in Manjarkhed Kasba Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.